कुडाळ
जगातील अनेक दिव्यांग व्यक्तीनी हिंमत, जिद्दीच्या जोरावर जागतीक दर्जाचे यश मिळविले आहे. नोकरी, व्यवसाय या क्षेत्रासह क्रीडा प्रकारातही यश संपादन केले आहे. त्यामुळे दुर्दैवाने दिव्यांगत्व लाभलेल्या मुलांनी व त्यांच्या पालकानी खचून न जाता अशाप्रकारे यश मिळविलेल्या दिव्यांग व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ध्येय्य निश्चित करावे. या धेय्याला प्रचंड मेहनतीची जोड द्यावी. त्यातून तुम्हाला यश निश्चितच प्राप्त होईल. हे यश अन्य सर्वसामान्य व्यक्तीनाही आश्चर्यजनक असेल, असे प्रतिपादन जिल्हा परिषद समाज कल्याण अधिकारी मदन भीसे यानी कुडाळ तालुक्यातील झाराप येथील जीवदान विशेष शाळा येथे दिव्यांग शीघ्र निदान व उपचार केंद्राचे उद्घाटन करताना केले.
झाराप येथील जीवदान विशेष शाळेमध्ये ३ डिसेबर या जागतीक दिव्यांग दिनाचे औचित्य साधत समाजातील ३ ते ६ वयोगटातील दिव्यांग बालकांसाठी शीघ्र निदान व उपचार सल्ला, मार्गदर्शन केंद्र सुरु करण्यात आले. श्री भीसे यानी फीत कापून याचा शुभारंभ केला. यावेळी संस्था संचालक फादर सिविचेन जोसेफ, फादर अरुण, फादर जस्टिन, मुख्याध्यापिका सिस्टर रोजम्मा जोब, हेमंत साळूखे तसेच अन्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना समाज कल्याण अधिकारी भीसे यानी, समाजातील दिव्यांग व्यक्तीच्या वैयक्तिक व कौटुंबिक विकासाकडे शासनाने अलीकडे भरीव लक्ष घातले आहेत. प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेला आर्थिक वर्षातील एकूण बजेटच्या ५ टक्के निधी दिव्यांग बांधव-भगिणी यांच्यासाठी राखीव ठेवला आहे. यातून व्यक्तिगत सुविधा तसेच व्यावसायिक मदत दिली जात आहे. राज्याचा समाज कल्याण विभाग व जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग यांच्याकडून विविध योजना राबविल्या जात आहेत. दिव्यांग व्यक्तीना कुत्रिम अवयव पुरविले जात आहेत. याचा फायदा दिव्यांग व्यक्तीनी घ्यावा, असे आवाहन केले.
यावेळी भीसे यानी जीवदान विशेष शाळेने ३ ते ५ वयोगटातील बालकांसाठी सुरु केलेले शीघ्र निदान व उपचार मार्गदर्शन केंद्र समाजातील दिव्यांग व्यक्तीना बहुपयोगी आहे. संस्था मोफत सेवा देणार आहे. संस्थेचा हा स्तुत्य उपक्रम आहे. अशाप्रकारे समाजातील संस्थानी पुढे येत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले पाहिजेत, असे सांगितले. यावेळी दिव्यांग दिनानिमित्त घेण्यात आलेल्या वेशभूषा व चित्रकला स्पर्धेतील विजेत्या स्पर्धाकांना बक्षीस वितरण भीसे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.