वेंगुर्ले :
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ मुंबईतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा विश्वकर्मा गुणवंत कामगार पुरस्कार मुंबई बंदर रुग्णालय प्राधिकरणाच्या परिचारिका सौ. निर्मला श्रीनिवास देऊसकर- परब यांना प्रदान करण्यात आला आहे. सौ. देऊसकर या साटेली ( ता. सावंतवाडी) च्या स्नुषा तर वेंगुर्ले येथील सेवानिवृत्त मंडळ अधिकारी गोविंद परब यांच्या सुकन्या आहेत. मुंबई परेल येथे सोमवारी झालेल्या सोहळ्यात त्यांना राज्यपाल रमेश बैस, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कामगार मंत्री सुरेश खाडे, कामगार आयुक्त यांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.२५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रशस्तपत्र असे पुरस्काराचे स्वरुप आहे. सौ. देऊसकार या गेली २४ वर्ष मुंबई बंदर च्या रुग्णालयात परिचारिका म्हणुन कार्यरत आहे. त्या कवयित्री असून त्यांच्या अनेक कविता वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. कोरोना काळात केलेले उल्लेखनीय कार्य, वैद्यकीय समुपदेशन या त्यांच्या कार्याची पुरस्कारासाठी विशेष दखल घेतली आहे. कोरोनोच्या सुरुवातीच्या काळापासून स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोना अतिदक्षता विभागात काम केले. अनेक दिवस कुटुंबापासून दूर राहत स्वतःला रुग्णसेवेत झोकून घेतले होते. याच कालावधीत त्यानी वैद्यकीय समुपदेशन ही केले होते. या त्यांच्या कार्याची दखल महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने घेऊन त्यांना पुरस्कार प्रदान केला आहे. दरम्यान सदर पुरस्काराची २५ हजाराची रक्कम टाटा स्मारक रुग्णालयातील कॅन्सरग्रस्त रुग्णांच्या मदतीकरिता त्यांनी समर्पित केली आहे. विश्वकर्मा गुणवंत कामगार हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल सौ. देऊसकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.