सावंतवाडी :
फुलपाखरांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पारपोली गावात दि. 20 ते 23 ऑक्टोबर दरम्यान फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आज पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधिक्षक सौरभ अग्रवाल, कोल्हापूर वनवृत्त मुख्यवनसंरक्षक आर. एस. रमानुजम यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. हा महोत्सव सावंतवाडी वनविभाग आणि पारपोली संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे.
पारपोली येथे फुलपाखरांच्या वाढीसाठी अतिशय वैशिष्ट्यपूर्ण सूक्ष्म असे वातावरण तसेच फुलपाखरांचे अन्न असलेली विविध प्रकारची फुले उपलब्ध आहेत. त्यामुळे सुमारे 180 हून अधिक विविध प्रकारची फुलपाखरे या गावात आढळतात. यातील फुलपाखरांच्या बहुसंख्य प्रजाती ऑक्टोंबर व नोव्हेंबर महिन्यामध्ये या पारपोली गावात आढळून येतात. त्यामुळे निसर्गप्रेमींसह पर्यटकांसाठी विविध प्रकारच्या फुलपाखरांचा अभ्यास करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे.
या महोत्सवात तज्ञ अभ्यासकांच्या मार्गदर्शनाखाली जंगलातील फुलपाखरांची माहिती पर्यटकांना देण्यात येणार आहे. तसेच आंबोलीच्या पायथ्याशी असलेले घनदाट जंगल व दरी खोऱ्यातील विविध दुर्मिळ वन्यजीवांची माहिती पर्यटकांना मिळणार आहे. फुलपाखरांचा जीवनक्रम व त्याबाबतचे वैज्ञानिक ज्ञान तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली मिळणार आहे. तसेच पारपोली गावातील पारंपारिक घरात राहण्यासह पारंपारिक खाद्य संस्कृतीचा आणि विविध पारंपारिक कला याचा आस्वाद घेण्याची संधी देखील पर्यटकांना मिळेल. निसर्गप्रेमींसह पर्यटकांनी या फुलपाखरू महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन सावंतवाडी वनविभाग व संयुक्त वन व्यवस्थापन समिती पारपोली यांनी केले आहे.
सदर महोत्सव दि. 20, 21, 22, 23 असा 4 दिवस असून त्यानूसार दोन ग्रुपमध्ये नोंदणी करण्यात आलेली आहे. तरी जे पर्यटक दि. 21, 22, 23 रोजी फुलपाखरू ट्रेलसाठी येणारे असतील त्यांनी सदरचा ट्रेल हा सकाळी 08 ते 12 वाजेपर्यंत होणार याची नोंद घ्यावी. येणाऱ्या कालावधीत डिसेंबर पर्यंत हा फुलपाखरू महोत्सव दर शनिवार, रविवार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास सहभागी होण्यासाठी पर्यटकांनी एकनाथ परब- 9405218716, राजेश कविटकर 9423509547, संदेश पवार 9405271994 या नंबरवर संपर्क साधावा.