You are currently viewing वीज ग्राहक संघटना सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न

वीज ग्राहक संघटना सावंतवाडी तालुका कार्यकारिणीची बैठक संपन्न

*महावितरण अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सबस्टेशननिहाय घेणार ग्राहक मेळावे*

 

सावंतवाडी :

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरणच्या भोंगळ आणि बेजबाबदार कारभाराचा फटका जिल्ह्यातील सर्वसामान्य ग्राहकांना बसत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता वीज खंडित करणे, सततचा वीज प्रवाह खंडित होणे, घरगुती ग्राहकांना, कृषी पंपांना येणारी भरमसाट वीज बिले, आदी अनेक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. महावितरण कार्यालय सावंतवाडीला निवेदने देऊन देखील कारभार सुधारत नसल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्येक सबस्टेशन अंतर्गत वीज ग्राहकांचे मेळावे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पैकी पहिला ग्राहक मेळावा बांदा येथे घेण्याचे ठरले. यावेळी तालुका अध्यक्ष संजय लाड, जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटेकर , जिल्हा सचिव निखिल नाईक, जिल्हा समन्वयक बाळ तथा गणेश बोर्डेकर आदींनी मार्गदर्शन केले.

गणेशोत्सव पूर्वी वीजेचा लपंडाव कमी असायचा परंतु गणेशोत्सव दरम्यान आणि नंतरच्या काळात सावंतवाडी शहरासह तालुक्यात अतिरिक्त प्रमाणात वीज खंडित होण्याचा प्रकार सुरू झाला असून महावितरण वर कोणाचाच वचक नसल्याचे दिसून येत आहे. महावितरणचे अधिकारी आश्वासने देतात परंतु त्यांच्याकडून कृती घडत नसल्याने आतापर्यंत दिलेल्या निवेदनांच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांकडून ग्राहक सेवेसाठी योग्य ती कार्यवाही करून घेण्यासाठी इन्सुली उपकेंद्र अंतर्गत ग्राहकांच्या बांदा येथे होणाऱ्या पुढील बैठकीत कुडाळ येथील मुख्य कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या व स्थानिक सहा. अभियंता आदींच्या उपस्थितीत ग्राहकांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे वीज ग्राहक संघटनेच्या बैठकीत ठरविण्यात आले. वीज वितरण कडून कामात होणारी दिरंगाई, गावागावात कंत्राटी वायरमनच्या जीवावर चालणारी यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी लाईनमनची नियुक्ती करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणणे आवश्यक आहे. भविष्यात येणारे वीजेचे प्रीपेड मीटर हा ग्राहकांच्या हक्कांवर गदा आणणारा निर्णय असून अनेक गावांमध्ये अजूनही इंटरनेटच्या सुविधा उपलब्ध नसल्याने मीटरचे रिचार्ज संपल्यावर ग्राहकांना अंधारात राहण्याची वेळ येईल. त्यामुळे वीज ग्राहकांमध्ये याबाबत जागरूकता आणून प्रीपेड वीज मीटर निर्णयास कडाडून विरोध करण्याबाबतही विचार करण्यात आला.

वीज ग्राहकांच्या तक्रारी घरगुती, औद्योगिक, कृषी अशा वेगवेगळ्या निकषानुसार घेऊन वीज वितरणने तशी पोच द्यावी. तक्रारींचे तात्काळ निरसन करून त्याचे उत्तर ग्राहकांना वेळेत देण्यात यावे. वीज कर्मचारी वीज डायरेक्ट गेली अशी दिशाभूल करतात, त्याबाबत अधिकाऱ्यांनी योग्य ते उत्तर द्यावे, वीज ग्राहक संघटना सदस्य, ग्राहकांशी योग्य भाषेत बोलावे. काही अधिकारी सरकारी फोन असूनही उचलत नसल्याने त्यांना ताकीद देण्यात यावी. वर्षानुवर्षे लोंबकळत असलेल्या कमी उंचीच्या पोलवरील लाईन मुळे मोठी वाहने जाताना अडथळे येतात, तेथील जुनाट पोल बदलून उंची वाढविण्यात यावी. अशा अनेक मागण्या महावितरण कडे करण्याचे ठरविले.

यावेळी वीज ग्राहक संघटना सदस्य पुंडलिक दळवी (सावंतवाडी), समीर शिंदे (देवसू), निलेश परब (आरोस), संजय कानसे (माजगाव), संतोष तावडे (ओटवणे), समीर जाधव (सरमळे), कृष्णा गवस, सुभाष सावंत(कोनशी), सिद्धेश तेंडुलकर (मळगाव), रामचंद्र राऊळ (तळवडे), अनिल गोवेकर(धाकोरे), सदाशिव आळवे (कामळेविर) आदी सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा