कुडाळ :
कोकणातील लोकांचे लाडके लोकप्रिय माजी खासदार बॅरिस्टर नाथ पै यांच्या अकालीनिधनामुळे त्यांचे कोकण रेल्वेचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करणारे कोकण रेल्वेचे शिल्पकार तथा माजी रेल्वेमंत्री प्रा.मधु दंडवते यांच्या 2023- 24 या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या योगदानाचा उचित सन्मान व्हावा म्हणून प्रा. मधु दंडवते स्मारक समिती व कोकणातील नागरिकांतर्फे के .आर. सी. एम्प्लॉईज युनियन चे उपाध्यक्ष उमेश गाळवणकर यांच्या पुढाकाराने कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांना नुकतेच एक निवेदन देण्यात आले. त्यामध्ये प्रा. मधु दंडवते यांनी जॉर्ज फर्नांडिस यांच्या सहकार्याने कोकण रेल्वेच्या रूपाने जी कोकण विकासाची मुहूर्तमेढ रोवली त्याची उचित जाणीव समाजाला व्हावी या उद्देशाने; तसेच येणाऱ्या सर्व पिढ्यांना कोकण रेल्वेच्या निर्मितीमधील प्रा.मधु दंडवते यांचे जे योगदान आहे त्याची माहिती व्हावी व त्यांच्या प्रामाणिक, सत्यानिष्ठ व सत्शील चारित्र्याच्या स्मृती स्मरणात राहाव्या या उद्देशाने कोकण रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालकांना बेलापूर भवन सी.बी.डी. बेलापूर नवी मुंबई येथे देण्यासाठी कुडाळ रेल्वे स्टेशन मास्तर यांच्याकडे सदर निवेदन सुपूर्द करण्यात आले. व एक प्रत केंद्रीय रेल्वेमंत्री दिल्ली येथेही पाठविण्यात आली.
त्या निवेदनामध्ये काही पुढील महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या –
१) कोकण रेल्वेच्या रत्नागिरी स्थानकामध्ये प्राध्यापक मधु दंडवते यांचे तैलचित्र लावण्यात यावे.
२) सावंतवाडी रेल्वे स्थानकास टर्मिनस म्हणून मान्यता देऊन प्रा मधु दंडवते टर्मिनस असे नामकरण करण्यात यावे
३) प्रा. मधु दंडवते यांच्या नावे नवीन ट्रेन्स सुरू करण्यात यावी.
४) रत्नागिरी रेल्वे स्थानक ते मुंबई गोवा महामार्ग या जोड रस्त्याला प्रा. मधु दंडवते यांचे नाव देण्यात यावे तसेच
५)पूर्वी कर्नाटक मध्ये रामकृष्ण हेगडे सॉफ्ट स्किल ट्रेनिंग सेंटर व मडगाव येथे जॉर्ज फर्नांडिस टनेल ट्रेनिंग सेंटर सुरू केले आहे तशा प्रकारचे ट्रेनिंग सेंटर महाराष्ट्रात कुडाळ येथे सुरू करण्यास येऊन त्यास प्रा. मधु दंडवते ट्रेनिंग सेंटर असे नाव देण्यात यावे.
अशा मधु दंडवते यांचा सन्मान करणाऱ्या विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले .वरील मागण्या 26 जानेवारी 2024 च्या आत मान्य कराव्यात. अशी प्रा मधु दंडवते स्मारक समिती व कोकणातील नागरिकांतर्फे मागणी/विनंती करण्यात आली व शंभर सह्या असलेल्या नागरिकांचे निवेदन देण्यात आले.
या मागण्यांकडे कानाडोळा केल्यास कोकणाच्या नागरिकांतर्फे व प्रा. मधु दंडवते स्मारक समिती तर्फे विविध स्तरांवर आंदोलनं छेडण्यात येईल असा इशाराही देण्यात आलेला आहे. यावेळी प्रा मधु दंडवते स्मारक समितीचे पदाधिकारी, निमंत्रक उमेश गाळवणकर, डॉ. व्यंकटेश भंडारी, प्रा.वैशाली ओटवणेकर, प्रा.प्रथमेश हरमलकर, प्रा.सुमन करंगले-सावंत, प्रा.नेहा महाले, प्रा.भाग्यश्री भोगटे, बॅ.नाथ पै नर्सिंग महाविद्यालयाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
अशा स्तुत्य मागणीना कोकणातील सर्व स्तरातून व्यापक पाठिंबा मिळाल्यास मधु दंडवते यांच्या कोकण रेल्वेच्या निर्मितीतील योगदानाचा योग्य सन्मान होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.