You are currently viewing प्रतिभावंत ज्येष्ठ कवयित्री स्व. शांता शेळके म्हणजे साक्षात कविता

प्रतिभावंत ज्येष्ठ कवयित्री स्व. शांता शेळके म्हणजे साक्षात कविता

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा.सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी माधव उर्फ वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम लेख*

 

*प्रतिभावंत ज्येष्ठ कवयित्री स्व. शांता शेळके म्हणजे साक्षात कविता*

 

*मला गुरुवर्य स्व. शांताबाई शेळके या महान व्यक्तिमत्वाचा प्रत्यक्षात लाभला हे माझे भाग्य..!!*

स्व. ज्येष्ठ कवयित्री वंदनीय शांता शेळके यांचा माझा परिचय होणं हा खरच दैवयोग आहे असेच म्हणावे लागेल. माझ्या मुद्रण व प्रकाशनच्या व्यवसाया निमत्त माझी सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रात कामानिमित्ताने फिरती असे.असाच एकदा मी कोल्हापुरला गेलो असता तिथे *गुरुराज प्रिंटर्स प्रा.लिमिटेड* या मुद्रणालयात काम सुरु होते.माझे व मुद्रक श्री. जयंत शिवदे यांचे खुपच घनिष्ठ संबंध होते. संध्याकाळी वेळ होता म्हणून आम्ही दोघे रंकाळ्यावर चाट ( भेळ ) खाण्यासाठी म्हणून गेलो. तेंव्हा मला शिवदे म्हणाले ” आप्पा समोरून कोण येत आहे पाहिलं कां ? मी त्यांना म्हणालो ” नाही बुआ मी त्यांना कधीच पाहिले नाही ” तेंव्हा शिवदे यांनी ” अहो नाना म्हणून हाक मारली , आणि नाना आले देखील …

अन मला म्हणाले अहो आप्पा हे नाना म्हणजे ” *ख्यातनाम , विख्यात , शब्दप्रभु , गीतकार जगदीश खेबुडकर* आहेत.

मला त्यांना पाहुन आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांचे माझे मैत्र संबंध पुढे खुपच दृढ़ झाले त्यांच्या माझ्या भेटी होवू लागल्या आणि त्यांच्या मुळेच *माझी व स्व. शांताबाई शेळके यांची ओळख झाली. परिचयातुन परिचय होता होता कविवर्य द.वि. केसकर ( घरात हसरे तारे असता या गीताचे गीतकार ) , भावगीत गायक गजाननराव वाटवे , बबनराव नावडीकर , कविवर्य सुधाकर देशपांडे , कविवर्य गंगाधर महांबरे , संगीतकार , यशवंत देव , नंदू होनप यांचा माझा परिचय झाला हा आयुष्यातील *दुग्धशर्करा* योग होता असेच म्हणावे लागेल.

पुण्यात मध्यवर्ती माझे डेक्कनवर ऑफिस असल्यामुळे या सर्वांचेच माझ्याकड़े येणे जाणे असे त्यामुळे या सर्वांचाच मला सहवास लाभला.

सातारा पुणे माझे बहुअंशी एक दिवसाआड़ येणे जाणे असे आणि त्यामुळे सातारा रोडवरील शांताबाई शेळके यांच्या बंगल्यावर मी त्यांची भेट घेत असे. बरेच वेळा पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार श्री. जयराम देसाई देखील माझ्या सोबत असत. प्रत्येक भेटित गुरुवर्य शांताबाईंशी साहित्य / काव्य यावर अगदी मनमुराद मुक्त चर्च्या होत असे. त्या प्रत्येक शब्दातील बारकावे समजून सांगत असत.

 

भेटलेल्या सर्वच गुरुवर्यांच्या मार्गदर्शनाबद्दल मी सदैव कृतज्ञ आहेच . माणसं ही योगायोगाने भेटतात .

या भेटलेल्या सर्वच दिग्गज साहित्यिकांशी माझा खुप जवळून परिचय झाला . साक्षात ज्यांना कविताच म्हणता येईल अशा ज्येष्ठ मार्गदर्शक गुरुवर्य कवयित्री कै. शांताबाई शेळके यांच्या सहवासातील माझ्या खुप आठवणी आहेत त्यातील काही आठवणी मी या लेखात मुद्दाम लिहित आहे.

ज्येष्ठ कवयित्री स्व.शांताबाई शेळके यांची माझी आठवड्यातुन किमान दोनदा तरी पुणे येथे त्यांच्या पुणे सातारा रोडवरील बंगल्यात भेट होत असे ! अगदी मुक्त चर्च्या होत असे ..त्यांचे मार्गदर्शन मला होत असे. माझ्या *आत्मरंग* काव्यसंग्रहाला त्यांनी दिलेल्या त्यांच्या प्रस्तावनेत त्यांनी माझे खूप कौतुक केले आहे. ” त्या म्हणतात कविवर्य वि.ग.सातपुते यांनी लिहिलेल्या आत्मरंग या प्रासादिक काव्यसंग्रहातील त्यांचे प्रांजळ मनोगत प्रथम वाचकाने वाचावे !

असे म्हणले आहे . आणि मलाही सांगीतले की ..तू प्रवास वर्णनही लिही . याचा अर्थ त्यांनी माझ्या सर्वच काव्य रचना मुळापासुनच वाचल्या होत्या आणी

*त्यांनी मुक्त चिंतनात्मक प्रतिक्रिया व सुंदर आशिर्वादात्मक प्रस्तावना मला दिली होती. तोच मला मिळालेला सर्वोच्च , श्रेष्ठतम पुरस्कार होता . आणि आहे हे मी मानतो.*

 

माझ्या २६ ऑगस्ट २०१८ रोजी एस.जी.फ़िल्म प्रोडक्शन पुणे यांनी घेतलेल्या मुलाखतीत कै.कवयित्री शांताबाईं शेळके यांनी मला केलेल्या मार्गदर्शना बद्दल मी सदैव कृतज्ञता व्यक्त केली आहे. माझी एक कवीता होती ..

” *प्रिये आठवण तुझी येते …*

*काही समजत नाही …*

*काही उमजत नाही….*

*प्रिये आठवण तुझी येते….।।*

मी त्यांना ती गावून दाखविली ..

पण त्याच क्षणी त्या म्हणाल्या ” अरे थांब ” एक काम कर ! *प्रीये* या शब्दा ऐवजी *सखये* हा शब्द टाक ! आणी आता म्हण !…

मित्रहो दोनही शब्दांच्या मात्रा सारख्या आणी अर्थही सारखा आहे. पण केवळ त्या *”सखये “* या एका शब्दाने त्या रचनेची गेयता खुपच सुंदर झाली. ती रचना पुढे रेकॉर्ड झाली.

*हा साक्षात ज्यांना कविताच संबोधले जाते अशा कै. शांताबाई शेळके यांचाच मला लाभलेला आशीर्वाद होता.*

पुढे तीच रचना संगीतकार कै. विलास आडकर यांनी त्वरित संगीतबद्ध केली देखील.

त्यांच्या *सखये* या एका शब्दान त्या रचनेची उंची वाढली हे मात्र खरे.

अशा अनेक घटना आहेत . पुढे माझे कॉलेज मित्र डॉ. भाऊसाहेब कणसे यांच्या *ख्यांगाट* माणदेशी ग्रामीण भाषेतील काव्यसंग्रहाचे प्रकाशन देखील त्यांच्याच हस्त्ये सातारला झाले होते. त्या प्रसंगीही मी त्यांच्या सोबत होतो. त्या माझ्या सातारच्या घरीही आलेल्या आहेत. हा एक आनंदी योग आहे.

स्व. शांताबाई शेळके , स्व. सरोजनी बाबर ,( माझे मित्र डॉ. मोहन सुखटणकर यांच्या आत्या ) स्व. सुनिती पाटिल ( बैरिस्टर पीजी पाटिल सरांच्या पत्नी ) यांचीही छान मैत्री होती. या सर्व दिग्गज प्रभृतींना एकत्रित भेटण्याचे अनेक प्रसंग आले.

अशा सर्वच सारस्वतांचा सहवास आणि मार्गदर्शन जीवन घडवून जातो. याचा प्रत्यय मला आला.

१९९६ साली आलंदी येथे झालेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात स्व. लतादिदी मंगेशकर व स्व. शांताबाई शेळके या अध्यक्ष व प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. त्यावेळी देखील अनेक साहित्यिक कवी यांचीही भेट झाली. तसेच मंगेशकर कुटुंबाची भेट केवळ गुरुवर्य शांताबाई शेळके यांचेमुळेच झाली. तसेच माझे गुरुवर्य कै. डॉ. द.भी. कुलकर्णी यांचेही संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांचे अगदी जवळचे मित्रत्वाचे संबंध असल्यामुळे माझा पंडित हॄदयनाथ मंगेशकर यांनाही वारंवार भेटण्याचा योग आला . हे सगळे ऋणानुबंधी धागे जुळले गेले.

*सारे अविस्मरणीय आहे..!*

आणि त्या सर्व आठवणी जगवित रहातात आणि लेखनास प्रवृत्त करतात.

या लेखात उल्लेख केलेल्या विभूतींच्या सहवासात रहाण्याचे प्रसंग म्हणजे आयुष्यातील मंतरलेले दिवस होते असेच मी म्हणेन.

गुरुवर्य स्व. शांताबाई शेळके यांनी मला दिलेला आशीर्वाद …..

*”शब्द , शब्दभावनां त्या अतर्क्य* *अनामिकचे दान आहे. वळवाच्या पावसात टपटप पडणाऱ्या गारा प्रमाणे* *शब्द येत असतात ते आपण जशा गारा उचलतो त्याप्रमाणे अगदी अधीर मनाने आपण आपल्या मनाच्या प्रांगणात ईश्वर कृपेने पडणाऱ्या* *शब्दान्ना ओंजळीत झेलित रहावे आणि आणि प्रसन्नतेने आत्ममुख होवून सदैव* *लिहित रहावे.. ! लिहित रहावे….!!*

तू ही लिहित रहा हा आशीर्वाद फळाला हे आजचे वास्तव आहे…..

खुप आठवणी आहेत पण………..

*इती लेखन सीमा*

 

*वि.ग.सातपुते.*

*अध्यक्ष : महाकवी कालिदास प्रतिष्ठान*

*पुणे , मुंबई , ठाणे ,मराठावाडा (महाराष्ट्र )*

📞 *(9766544808)*

*दिनांक:- ११ – १० – २०२३*

प्रतिक्रिया व्यक्त करा