*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री अख्तर पठाण लिखित अप्रतिम काव्यरचना*
*”हरवलेलं घरपण”*
येईल का हो पुन्हा घरपण हरवलेलं,
होत नसते कधी मानवाने ठरवलेलं..।
सजीव झाले फ्लॅट आता निर्जीव झाले घर,
संवेदनहीन झाले अवघे नार आणि नर..।
वृद्धांना मान होता लहानांना मिळे आदर,
नात्यागोत्यांची कुणाला नाही राहिली कदर..।
साजरे व्हायचे आनंदाने दसरा दिवाळी,
एकमेकांची भेट हीच असायची नव्हाळी..।
लग्न कार्य म्हणजे जणू पुण्य कार्य असायचे,
कुणाचे कुणाशी कधी भांडण तंटे नसायचे..।
नवरी निरोप घेतांना मांडव सारा रडायचा,
तिची गळाभेट घ्यायला जो तो धडपडायचा..।
साऱ्या गावाला असायचे सूतक मरणाचे,
प्रत्येक घरून यायचे साहित्य सरणाचे..।
ऐकायचे नातू पणतू आजी आजोबांच्या कथा,
हासत राहे घर सदैव नसे कोणती व्यथा..।
कांदा कापायची सासू भाजी चिरायची सून,
सोबत गंजात पडायचे मिरची लसून..।
बाप लेकाचा कधी होत नव्हता वाद,
सणासुदीला मुलींची सर्वांना यायची याद..।
जेवतांना जशी बसायची अंगत पंगत,
ढेकरावर ढेकर खूप यायची रंगत..।
घरावर पत्रे होती भिंतीला होती माती,
प्रकाश पडे भरपूर मिणमिणत्या वाती..।
घरी प्रत्येकाचे असे एकमेकांत मन होते,
घर म्हणजे जणू एक नंदनवन होते..।
बदलले वारे घराचे बघा आता सगळे,
कावळे ओरडतात जिथे दिसायची बगळे..।
पर्यावरणासाठी जाळू नका सर्पण,
घराला बंधूंनो पुन्हा येऊद्या घरपण..।
✍🏻 *अख़्तर पठाण.*
*(नासिक रोड)*
*मो.:- 9420095259*