*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार यांनी दप्तरास लिहिलेले पत्र*
।। श्री।।
*प्राणप्रिय दप्तरा..*
*तुला माझे मनःपूर्वक दंडवत!*
माझं शाळेतलं तुला सोबत घेऊन टाकलेलं पहिलं पाऊल ते नातींच्या स्कूल बँगपर्यंत…तुझं बदलत्या रुपातील अस्तित्व अमीट आहे.त्या बालवयात तुझी सोबत किती आनंद देणारी
उत्साहीत करणारी!
आमच्या वेळी तर आधी कापडी पिशवी…नंतर चौकोनी जाड कापडी शिवलेली रेडीमेड पसरट चौकोनी दप्तरं आलीत,खांद्यावर अडकवा किंवा हातात धरा..तुझ्या सोबत तुझे पक्के सोबती
पुस्तकं,वह्या,टाक,पेन्सिल, दौत ही असायची. टाकाने अक्षरं वळणदार येत.आत दगडी पाटी..तिला लाकडी मजबूत चौकट..हे सर्व तुझ्यात आठवणीने भरायचं,शाईची दौत छोट्या शा पिशवीत हातात वेगळी धरायची.. स्टीलची वाटी असलेला कडीच्या उभ्या डब्यात दुपारचे जेवण किंवा
खाऊ! मग मैत्रिणींना गोळा करत तुझ्यासह स्वारी शाळेत हजर!
लाकडी खांबाच्या सिमेंटच्या बैठकीवर लेखणीला टोकदार अणी करताना मज्जा वाटायची.
ती लेखणी आजही साथीला आहे…याचा कोण आनंद मनाला!
निवडक विषय,बालभारती अत्यंत आवडीचे..नवीन पुस्तके आणली की कव्हर लावून नाव टाकून तुझ्याकडे सुपूर्द करायची.
तुझ्या त अजून काय काय भरलेलं असायचं…
फाडलेले कागद..शाईचे कागद,चाँकलेट,चिक्की,
चिंचा,बोरं,भाजलेले चिंचोके,मधल्या सुटीत सख्यांसोबत वाटून खायला
चिंचेच्या आंबटगोड गोळ्या,अगदी कट्टी पक्की मैत्री सारख्या!
हे आठवणींनी भरलेलं दप्तर अजूनही आठवणीत रेंगाळत आहे.
आठवीपासून हातात पिरेड्स आणि कंपास पेटीन्यायला लागलो.आणि तुझा सहवास दुरावला .तुला रिकामं करतांना मन दाटून आलं..आणि लहान बहिणीच्या स्वाधीन तुला केलं…!पुढे शिकत राहिलो पण दप्तर मागे पडलं.
तुझी आठवण मात्र कधीच विसरले नाही. त्या दप्तरा तील पाटी पेन्सिलचीची मुळं
आजही तशीच घट्ट आहेत.
लेखनाच्या रूपात.ह्रदयाच्या दप्तरात हे लेखनाचं अस्तित्व जपून ठेवत आहे.
तुझी आठवण या पत्राद्वारे
व्यक्त करू शकते आहे.
सदैव तुझीच
अरूणा ….!
〰️〰️〰️〰️〰️🌹✒️
*अरूणा दुद्दलवार*