*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा कोकण मराठी साहित्य परिषद मालवणच्या सन्माननीय सदस्या लेखिका कवयित्री सौ.आदिती मसुरकर लिखित अप्रतिम लेख*
*भ्रमंती…एक अनुभव*
बाई पण भारी देवा या वाक्याचा प्रत्यक्ष अनुभव *चंदीगड – अमृतसर सिमला टूर* या पाच दिवसाच्या सहली मधून घेता आला .
संघटन जर उत्तम असेल तर आपण अवघड ध्येय सुद्धा सहज पार करू शकतो .खंबीर नेतृत्व व एकजूट या दोन्हींमध्ये खूप ताकद असते . गेले पाच दिवस आम्ही वीस मैत्रिणी या सर्व गोष्टींचा सुखद अनुभव घेत होतो .
आम्ही 20 मैत्रिणी परराज्यात नवरा , कुटुंब सोबत नसताना स्वतःची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर झेलत कधी मुक्तपणे फुलपाखरांसारखे बागडत होतो . तर कधी झाशीची राणी बनून येणाऱ्या आव्हानांना कठोर होऊन सामोरे जात होतो . प्रत्येक अनुभव हा आनंद देणारा , ज्ञानाची कवाडे उघडणारा , मनाला तजेला देणारा व नोकरी संसार कुटुंब या चौकटीत स्वतःला बांधून घेणाऱ्या आमच्यासारख्या महिलांना कधीतरी स्वतःसाठी जगायचं असतं हे शिकवणारा होता .रोजच्या कामांमुळे शीण झालेल्या मेंदूला ताजेतवाने करून पुन्हा नव्याने काम करण्यासाठी ऊर्जा देणारा होता .
जमिनीवरून उंच आभाळात उडणारी विमाने पाहण्यासाठी धावत येणाऱ्या मैत्रिणींना प्रत्यक्ष त्या विमानात बसून आकाशात उडण्याचा अनुभव घेता आला . विमानात बसून पृथ्वीवर रेखाटलेले डोंगर , हिरवीगार चौकोनी शेती , वळणावळणांचे रस्ते , नागमोडी वळणे घेत धावणारे नदीचे पाणी तसेच गगनचुंबी इमारती जणू छोट्या छोट्या आकाराच्या पेट्या भासत होत्या . इतकं सुंदर चित्र रेखाटणाऱ्या त्या विधात्याचे कौतुक करावे तेवढे कमीच होते . खूप जास्त गंमत वाटली तेव्हा जेव्हा हे विमान ढगांच्या वर स्वार झाले . कापसाचे मऊ मऊ पुंजके पाहून ते हातात पकडण्याचा मोह झाला . पांढऱ्याशुभ्र कापसाची जणू शेतीच होती ती ! त्या ढगांच्या शेतीमध्ये वेड्यासारखं फिरत राहावं असंच वाटत होतं .विमानातील हवाई सुंदरी, त्यांचा रुबाब, विमानतळ तेथील झगमगाट सर्वच मनाला लख्ख उजळवून टाकणारे ….
सुवर्ण ताज चढवून तेजाने झळकणारे सुवर्ण मंदिर व त्याच्या पाण्यातील प्रतिबिंबाने प्रत्येकाच्या डोळ्यात तेज निर्माण केले. या मंदिरा सोबत आपला सेल्फी घेऊन तो हृदयात बंद करून ठेवावा असंच प्रत्येकीला वाटत होतं .
शालेय जीवनात इतिहास विषयात **जालियनवाला बाग हत्याकांड* वाचला होता . त्या बालवयात इंग्रजांविरुद्ध प्रचंड चीड निर्माण झाली होती . आज प्रत्यक्ष ती बाग , मौत का कुआँ पाहताना वाचलेले ते सर्व प्रसंग डोळ्यासमोर आले .सतत तेवत असणारी ती अमरज्योत देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या त्या हुतात्म्यांची आठवण करून देत होती . मनोमन त्या वीर पुत्रांना सलामी देत प्रत्येक पाऊल पुढे टाकत आम्ही त्या बागेतून बाहेर पडलो .
संध्याकाळी जेव्हा आम्ही वाघा बॉर्डरवर पोहचलो तेव्हा तेथील दृश्य पाहून आम्ही भारावून गेलो . उंचावर फडकणारा तिरंगा आणि देशाच्या संरक्षणासाठी खंबीरपणे जागोजागी उभे असणारे आपल्या सेनादलातील सैनिकांना पाहून अभिमानाने उर भरून आला .मध्यभागी हातात माईक घेऊन ,जमलेल्या प्रत्येक भारतीयाच्या मनात मायभूमीबद्दल जोश निर्माण करणाऱ्या त्या सैनिकाचे कौतुक करावे तेवढे कमीच होते .भारतीयांच्या मनात देशप्रेम जागृत करणाऱ्या गाण्यांच्या तालावर सर्व मैत्रिणींनी उत्साहाने फेर धरला .
संगीताच्या ठेक्यात हातात झेंडा , तलवार घेऊन रुबाबात संचलन करणाऱ्या सैनिकांना पाहून नतमस्तक व्हावेसे वाटले .या बॉर्डरवर आपल्या जीवाची पर्वा न करता हे सैनिक लढतात म्हणूनच तर आपण आपल्या घरात सुखा समाधानाची झोप घेऊ शकतो. त्यांचे ते संचलन प्रत्येक जण डोळे विस्फारून पाहत होते .टाळ्यांचा व घोषणांचा आवाज सगळीकडे घुमत होता .भारत पाकिस्तान हद्दीच्या मध्ये असणारा बंद गेट जेव्हा उघडला गेला तेव्हा एक चित्त थरारक अनुभव घेत असल्याचा भास झाला .
अनेक दगडांची कलाकृती असणारे रॉक गार्डन !किती पाहू व किती डोळ्यात साठवू असे ठरणारे होते . प्रत्येक जण ती दगडी शिल्पे आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करून ठेवण्यात गढले होते .
हिमाचल प्रदेशातील शिमल्याला जातानाचा अनुभव हा मनाला आनंद , थोडीशी भीती व आश्चर्य वाटणारा होता . डोंगराळ भाग तेथील जीवन व निसर्गावर मात करून आपले जीवन जगणारा माणूस यांचे दर्शन घडवणारा तो भाग !सूर्यास्ताचा देखावा व पहाटेचा सूर्योदय खूपच विलोभनीय . मनाला गुदगुल्या करणारी गुलाबी थंडी व अलौकिक नैसर्गिक सौंदर्य…….तुकतुकीत कांतीच्या सडपातळ देखण्या स्त्रिया तर सर्वांचेच लक्ष वेधून घेत होत्या . काही जणींच्या मनात असेही विचार येऊन गेले की इथली एखादी सुंदर मुलगी सून करून घ्यावी . . . .
त्या डोंगराळ भागात घोड्यावरून केलेली सवारी तर शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देणारी होती . शिवाजी महाराज व झाशीची राणी यांचे स्मरण करत या वीस शूरवीर महिलांनी तो अवघड डोंगर सर केला . काश्मिरी वेशभूषा करत फोटो काढण्यात सर्व मैत्रिणी खूपच दंग झाल्या . या ठिकाणी सर्वात जास्त कौतुक करावसं वाटलं ते आपल्या ज्येष्ठ ताई *राजाध्यक्ष व कोरगावकर मॅडम* . चित्त थरारक असा जीवावर बेतणारा खेळ त्या यशस्वीपणे खेळल्या . आपल्या मैत्रीणींमधील एक तरुण ,उत्साही , तडफदार व्यक्तिमत्व *साधना सूर्यवंशी* यांनीही तो चित्तथरारक खेळ यशस्वीपणे पूर्ण केला .
जीव मुठीत घेऊन अनेक मैत्रिणींनी खोल दरीकडे व उंच आकाशाकडे पाहत रोप वे चा गेम पार पाडला . तेथे मिळालेले सर्व अनुभव हे प्रत्येकीचा आत्मविश्वास वाढवणारे होते . मनात उत्साह निर्माण करणारे होते .
शेवटी संध्याकाळच्या वेळेत मॉल रोड या ठिकाणी केलेली खरेदी ही प्रत्येकीला आपल्या कुटुंबाकडे , मुलांकडे , नातेवाईकांकडे घेऊन गेली . कारण प्रत्येक जण आपल्या प्रियजनांना प्रेमाची भेट वस्तू खरेदी करण्यामध्ये व्यस्त झाला होता .
शेवटी पाच दिवसात मिळालेले हे सर्व अनुभव हृदयाच्या कप्प्यात कायमस्वरूपी जतन करत प्रत्येक जण पुन्हा आपल्या घरट्याकडे निघाले .
आपल्या ओळखीतील एकही पुरुष सोबत नसतानाही धीर गंभीरपणे
एकीच्या बळावर आपण प्रवास करू शकतो. सहलीचा आनंद लुटू शकतो . हा आत्मविश्वास मिळवून देणारी ही एक अविस्मरणीय सहल ठरली. स्त्री ही अबला नसून ती नारीशक्ती आहे.
*बाईपण भारी देवा ! बाईपण भारी रे !*
*बाईपण भारी देवा ! बाईपण भारी रे!*
*🖋️© सौ आदिती मसुरकर*
*कुडाळ सिंधुदुर्ग*