मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
हँगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुष क्रिकेटच्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताने बांगलादेशचा नऊ गडी राखून पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने अंतिम फेरीमध्ये धडक मारली असून किमान रौप्य पदक निश्चित आहे. उद्या अंतिम फेरीत भारताचा सामना अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यातील विजेत्याशी होईल. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना नऊ गड्यांच्या मोबदल्यात ९६ धावा केल्या होत्या. टीम इंडियाने एक विकेट गमावून ९७ धावा केल्या आणि सामना जिंकला.
या सामन्यात भारतीय कर्णधार ऋतुराज गायकवाडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशची सुरुवात खूपच खराब झाली आणि पहिली विकेट १८ धावांवर पडली. यानंतर बांगलादेश संघ नियमित अंतराने विकेट्स गमावत राहिला आणि ९६ धावांवर बाद झाला. बांगलादेशकडून झाकीर अलीने सर्वाधिक नाबाद २४ धावा केल्या. परवेझ हुसेनने २३ धावांचे योगदान दिले. या दोघांशिवाय फक्त रकीबुल हसन (१४ धावा) दुहेरी आकडा पार करू शकला. बांगलादेशचे सात फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले नाहीत. दोन फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. भारताकडून रवी साई किशोरने तीन बळी घेतले. वॉशिंग्टन सुंदरने दोन गडी बाद केले. अर्शदीप सिंग, तिलक वर्मा, रवी बिश्नोई आणि शाहबाज अहमद यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
९७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवातही खूपच खराब झाली. गेल्या सामन्यात शतक झळकावणारा यशस्वी जयस्वाल खाते न उघडता बाद झाला. मात्र, यानंतर तिलक वर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी स्फोटक शैलीत धावा केल्या. चौथ्या षटकातच भारताची धावसंख्या ५० धावांपर्यंत पोहोचली. टिळकने नवव्या षटकात आपले अर्धशतक पूर्ण केले आणि टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर होती. भारताने ९.२ षटकात एक विकेट गमावून 97 धावा केल्या आणि सामना जिंकला. टिळक वर्मा २६ चेंडूत ५५ धावा आणि ऋतुराज गायकवाड २६ चेंडूत ४० धावा करून नाबाद राहिला. बांगलादेशकडून रिपन मोंडलने एकमेव विकेट घेतली.