पणजी / (प्रतिनिधी) :
साहित्यलेणी प्रतिष्ठान ताळगाव गोवा आणि बृहन्महाराष्ट्र मित्र मंडळ व्हाट्स एप ग्रुपच्या तिसऱा वर्धापनदिन पणजी येथे साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम १० ऑक्टोबर २०२३ रोजी गोमंतक साहित्य सेवक मंडळात दुपारी ३.०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला ग. दि. माडगुळकर यांच्या कवितेतील शब्दसौंदर्य या विषयावर सुकन्या सुजीत जोशी यांचे व्याख्यान होणार आहे. गदिमांच्या कवितेतील सौंदर्य स्थळांचा त्या आस्वादक रीतीने आढावा घेतील.
१ ऑक्टोबर १९१९ हा महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गदिमांचा जन्म दिवस असून यंदा त्यांच्या १०५ वे वर्ष सुरू आहे. त्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन गोमंतकीय कवयित्री डॉ. अनुजा जोशी करतील. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोवा राज्याचे लोकायुक्त न्या.अंबादास जोशी असतील. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बृहन्महाराष्ट व्हॉटस अप ग्रुपचे मुख्य प्रशासक प्रशांत गौतम (संभाजीनगर, औरंगाबाद) व युनियन बँक ऑफ इंडियाचे माजी वरिष्ठ व्यवस्थापक नारायण पांडव, डॉ. स्नेहा महांबरे याही उपस्थित असतील.
या वर्धापन दिनानिमित्त त्याच दिवशी सायंकाळी चार वाजता साहित्य सेवक मंडळाच्या सभागृहात काव्यांजली ही निमंत्रितांच्या कवितेच्या मैफलीचा कार्यक्रम होईल, असे साहित्य लेणी प्रतिष्ठानच्या अध्यक्ष चित्रा क्षीरसागर व संयोजक प्रकाश रामचंद्र क्षीरसागर यांनी कळविले आहे.
सुकन्या जोशी या उत्तम निवेदक असून गदिमा रचित गीतरामायणाचे त्या निवेदन करतात. श्रीधर फडके सादर करीत असलेल्या ३५० कार्यक्रमांचे निवेदन त्यांनी केले आहे. सलील कुलकर्णी व रवींद्र साठे यांच्या कार्यक्रमाचे निवेदन देखील त्यांनी केले आहे. सुस्वर क्रिएशन ही संस्था त्या चालवतात. नाशिक आकाशवाणीवर त्या निवेदक म्हणून काम करीत होत्या. सुस्वर क्रिएशनतर्फे पद्मजा फेणाणी, अरुण नलावडे आदींच्या मुलाखती त्यांनी घेतल्या आहेत. रोटरी क्लब कल्याण (महाराष्ट्र) या संस्थेचा स्त्री गौरव पुरस्कार त्यांना मिळाला आहे. सतीश दिवाण यांच्या स्मतिप्रीत्यर्थ्य त्यांना उत्कृष्ट निवेदिका पुसस्कारही त्यांना मिळाला आहे. शब्दमैफिल हा पुरस्कारही त्यांना मिळाला आहे.