You are currently viewing दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे अध्यात्मरंग महोत्सव

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे अध्यात्मरंग महोत्सव

*दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे अध्यात्मरंग महोत्सव*

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :

दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रातर्फे गेली वीस वर्षे ‘अध्यात्मरंग महोत्सव’ आयोजित करण्यात येत आहे. या महोत्सवांतर्गत अनेक विचारवंतांची व्याख्याने, किर्तने, प्रवचने सादर करण्यात आली. या वर्षी हा महोत्सव ७ ते ८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत ‘आनंदवारी-नर्मदा आणि पंढरी’ या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आला आहे.
शनिवार दिनांक ७ ॲाक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता उदयन् आचार्य यांचे ‘नर्मदा परिक्रमा-एक आनंदयात्रा’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. याच नांवाचे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले असून परिक्रमेतील त्यांचे अनुभव त्यांनी ओघवत्या शैलीत लिहिले आहेत. त्यांच्या व्याख्यानातून श्रोत्यांना परिक्रमेचा अनुभव घेतल्याचा आनंद मिळेल. उदयन् आचार्य नर्मदा तटावरील महेश्वर येथील सप्तमातृका मंदिरात वर्षातील बराच काळ वास्तव्य करून परिक्रमावासींची सेवा करतात.

रविवार दिनांक ८ ॲाक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता सुधीर महाबळ हे ‘एक तरी वारी अनुभवावी’ या विषयावर पंढरपूर वारीबद्दल बोलतील. वारी आणि परतवारीवरही ते आपले अनुभव कथन करतील. इलेक्ट्रॅानिक्स इंजिनिअर असलेल्या महाबळ यांनी बहुराष्ट्रीय कंपनीत मोठ्या पदावर काम केले आहे. आवड म्हणून ते अनेक वर्ष वारी आणि परतवारी करीत असून त्यांच्या “परतवारी” या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य शासनाचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे.

हा महोत्सव सर्वांसाठी खुला असून श्रोत्यांनी या व्याख्यानांचा लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्राच्या वतीने करण्यात आले आहे. संस्थेच्या वा. वा. गोखले या वातानुकूलित सभागृहात व्याख्याने होतील. अधिक माहितीसाठी संपर्क ०२२-२४३०४१५०

प्रतिक्रिया व्यक्त करा