सावंतवाडी
मळगाव येथील महिलेने घरालगत असलेल्या ओहोळात आत्महत्या केली. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. दिपाली दशरथ हरमलकर (वय ५८, रा. सावळवाडा) असे तिचे नाव आहे. तिने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आपण आजारपणाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे. याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, संबंधित महिला काल सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ओहोळाच्या दिशेने जात असलेली काही लोकांनी पाहिली होती. मात्र ती काही कामानिमित्त जात असल्याचे त्यांना वाटल्याने त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केला. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने घरच्या मंडळींनी तसेच शेजाऱ्यांनी शोधाशोध सुरू केली. यावेळी मळगाव-सावळवाडा येथील ओहळावर घातलेल्या बंधाऱ्यालगत तिची चप्पल आढळून आली. त्यानंतर आज सकाळी पुन्हा शोधकार्य सुरू केल्यानंतर ओहोळातील एका झुडपाला अडकलेल्या स्थितीत संबंधित महिलेचा मृतदेह आढळून आला. यानंतर त्याबाबतची माहिती सावंतवाडी पोलिसांना देण्यात आली. तिच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
मात्र रात्री उशीर झाल्याने शोध घेण्यात यश आले नाही. दरम्यान रात्री उशिरा घरात तिने लिहून ठेवलेली चिठ्ठी आढळून आली. या चिठ्ठीत तिने “आपण आजाराला कंटाळून आत्महत्या करीत आहे” असे म्हटले असल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.