कुडाळ :
कुडाळ एमआयडीसी कुंभारवाडी येथे वासुदेव बनून आलेल्या ५ जणांना मारहाण केल्याप्रकरणी कुंभारवाडी व पिंगुळी येथील ७ जणांविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान हा गुन्हा दाखल झाल्याचे समजतात कुडाळ पोलीस ठाण्यात वाडीवरवडे, पिंगुळी, कुडाळ कुंभारवाडी येथील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.
वासुदेव बनून आलेल्या बारामतीतील ५ जणांनी वाडीवरवडे, पिंगुळी, कुडाळ कुंभारवाडी येथे अनेकांची फसवणूक करून त्यांच्याकडून रक्कमा घेतल्या होत्या आणि याबाबत कुडाळ पोलीस ठाण्यात वाडीवरवडे येथील महेश धुरी यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर फसवणूक करणाऱ्या बारामती येथील ५ जणांना अटक करण्यात आली होती. याप्रकरणी ५ जणांना २ दिवसाची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर न्यायालयात हजर केले असता त्यांची जामीनावर मुक्तता करण्यात आली होती. दरम्यान फसवणूक करणाऱ्या या पाच जणांना मारहाण केली म्हणून पिंगुळी व कुडाळ येथील ७ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दि. २२ सप्टेंबर रोजी एमआयडीसी कुंभारवाडी या ठिकाणी युवराज वसंत गंगावणे, राजु रंगराव ढवळे, मालोजी राजी ढवळे, संजय रंगराव ढवळे, सुनिल वसंत गंगावणे (सर्व रा. बारामती जि. पुणे) यांना मारहाण केल्याप्रकरणी अमित चव्हाण, बाळा पावसकर, यश पावसकर व इतर चार अनोळखी इसमांनी शिवीगाळ करून अमानुषपणे लाथाबुक्यांनी मारहाण करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली व घडलेला घटणेचा व्हिडिओ सोशल मिडियाच्या विविध माध्यमाव्दारे व्हायरल केला म्हणून कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत फिर्याद पोलीस हवालदार स्वप्निल तांबे यांनी दिली आहे.
भटक्या विमुक्त जाती समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष शशिकांत इंगळे यांच्यासह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ पोलीस ठाणे येथे निवेदन देऊन वासुदेव बनून आलेल्यांना मारहाण करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओवरून कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
वासुदेव बनून आलेल्यांना मारहाण केल्याप्रकरणी पिंगुळी व कुडाळ कुंभारवाडी येथील सात जणांविरोधात कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला हे समजतात ग्रामस्थांनी कुडाळ पोलीस ठाण्यात गर्दी केली होती तसेच याप्रकरणी अजून ज्या नागरिकांची फसवणूक झाली आहे त्यांचे जबाब पोलीस ठाण्यात नोंदवून घेतले जात होते.