ग्रामस्थांत भीतीचे वातावरण; पाळीव जनावरांना धोका; वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी
बांदा
बांदा-शिरोडा मार्गावरील पाडलोस जिल्हा परिषद शाळा नं.1 जवळ दोन दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी एका महाकाय आठ ते दहा फुटी मगरीचे दुचाकीस्वारास दर्शन झाले. केणीवाडा येथे मे महिन्यामध्ये वनविभागाच्या हातातून निसटलेली ती मगर हिच तर नव्हे ना, अशा भितीदायक चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे धोका टाळण्यासाठी वनविभागाने सदर मगरीचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी वाहनचालक, प्रवासी व ग्रामस्थांमधून होत आहे. न्हावेली येथून बांदाच्या दिशेने जात असलेले दुचाकीस्वार सालु फर्नांडीस यांना शुक्रवारी रात्रो 10 वाजताच्या सुमारास पाडलोस जि.प.शाळा नं.1 येथे रस्त्याच्या डाव्याबाजूने आठ ते दहा फुटी महाकाय मगर दिसली. फर्नांडीस यांनी गाडीचा हॉर्न वाजविल्याने त्या मगरीने रस्त्यावरूनच दहा ते पंधरा मीटर धुम ठोकली. परंतु काही वेळाने रस्त्यानजीक असलेल्या पानथळ भागात मगर गेल्याचे श्री.फर्नांडीस यांनी सांगितले.