मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. राजकोट येथे बुधवारी (२७ सप्टेंबर) झालेल्या सामन्यात पाहुण्या संघाने ६६ धावांनी विजय मिळवला. या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या द्विपक्षीय वनडे मालिकेत प्रथमच क्लीन स्वीप करण्याचे भारताचे स्वप्नही अधुरे राहिले. ५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकापूर्वी दोन्ही संघांचा हा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना होता. या पराभवासह टीम इंडिया वर्ल्ड कपमध्ये जाणार आहे. त्याचबरोबर कांगारू संघ विजयासह स्पर्धेत प्रवेश करेल.
योगायोगाने दोन्ही संघांचा विश्वचषकातील पहिला सामनाही एकमेकांविरुद्ध आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ ८ ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर आपल्या मोहिमेला सुरुवात करतील. ऑस्ट्रेलियाने पाचवेळा तर भारताने दोनदा विश्वचषक जिंकला आहे. यावेळी दोन्ही संघ विजेतेपदाचे दावेदार आहेत.
प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ५० षटकांत सात गडी गमावून ३५२ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ ४९.४ षटकांत २८६ धावांवर गारद झाला. राजकोटमधील चार एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचा हा तिसरा पराभव आहे. टीम इंडिया २०१३ मध्ये पहिल्यांदा येथे एकदिवसीय सामना खेळली होती. त्यावेळी इंग्लंडविरुद्ध नऊ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेने १८ धावांनी पराभव केला. २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३६ धावांनी विजय मिळवला होता. आता याच संघाविरुद्ध येथे ६६ धावांनी पराभव पत्करावा लागला आहे.
भारताकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ८१, विराट कोहलीने ५६ आणि श्रेयस अय्यरने ४८ धावांची खेळी खेळली, पण संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाहीत. रवींद्र जडेजाने ३५ आणि केएल राहुलने २६ धावांचे योगदान दिले. वॉशिंग्टन सुंदर सलामीला आला आणि १८ धावा करून बाद झाला. सूर्यकुमारला केवळ आठ धावा करता आल्या. जसप्रीत बुमराहने पाच आणि कुलदीप यादवने दोन धावा केल्या. ऑस्ट्रेलियाकडून ग्लेन मॅक्सवेलने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. जोश हेझलवूडला दोन विकेट मिळाले. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, कॅमरून ग्रीन आणि तन्वीर संघा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
त्याआधी ऑस्ट्रेलियाकडून मिचेल मार्शने ८४ चेंडूत १३ चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ९६ धावांची खेळी केली. तर डेव्हिड वॉर्नरने ५६, स्टीव्ह स्मिथने ७४ आणि मार्नस लॅबुशेनने ७२ धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या, मात्र त्यासाठी त्याने १० षटकांत ८१ धावा दिल्या.
हिटमॅन या नावाने प्रसिद्ध असलेला भारतीय कर्णधार रोहित शर्माने एक विक्रम रचला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५५० षटकार मारणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. तीनही फॉरमॅट एकत्र करून ४५१व्या सामन्याच्या ४७१व्या डावात त्याने ही कामगिरी केली. त्याच्या आसपास एकही भारतीय फलंदाज नाही. भारतासाठी सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत महेंद्रसिंग धोनी दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३५९ षटकार मारले होते.