पर्यटन व्यावसायिक महासंघातर्फे किल्ले सिंधुदुर्गवर साजरा होणार पर्यटन दिन
सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर
मालवण
भारत सरकार पर्यटन विभाग, पर्यटन व्यावसायिक महासंघ, तारकर्ली पर्यटन विकास संस्था तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने स्थापन झालेल्या युवा टुरिझम क्लब तसेच ग्राम पर्यटन समिती अध्यक्ष व समिती सदस्य यांच्या माध्यमातून दि. २७ सप्टेंबर रोजी मालवणच्या किल्ले सिंधुदुर्गवर जागतिक पर्यटन दिन साजरा केला जाणार असल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी दिली आहे.
पर्यटन आणि हरित गुंतवणूक ही जागतिक पर्यटन वर्ष २०२३ ची जागतिक संकल्पना असून किल्ले सिंधुदुर्ग वर साजरा होणाऱ्या या पर्यटन दिनाच्या कार्यक्रमास भारत पर्यटन विभाग नवी दिल्ली च्या अधिकारी सौ.भावना शिंदे उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून भारत पर्यटन विभागामार्फत सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्री. किशोर तावडे यांना भारत पर्यटन विभागामार्फत आमंत्रित करण्यात आले आहे. २७ सप्टेंबर रोजी या कार्यक्रमाची सुरवात सकाळी ९ वाजता स.का.पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय मालवण आयोजित श्री. भुजंग बोबडे यांचे संग्रहालय, पुरातत्व, सास्कृंतिक विषयावरील व्याख्यानाने होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता किल्ले सिंधुदुर्गवरील शिवराजेश्वर मंदिरामध्ये प्रमुख अतिथीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची विधिवत पूजा तसेच उपस्थितांना तसेच नव्याने स्थापन झालेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या युवा पर्यटन क्लब यांना सिंधुदुर्ग किल्ल्याबद्दल माहिती देण्यात येणार आहे. तसेच किल्ला परिसर क्लीन एण्ड ड्राइव मोहिम कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याचप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते तारकर्ली पर्यटन संस्थेच्या टुरिझम वेब पोर्टल चा छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामध्ये उद्घाटन समारंभ होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन विष्णू मोंडकर यांनी केले आहे.