– पालकमंत्री उदय सामंत
सिंधुदुर्गनगरी
जिल्हा परिषद 5 टक्के सेस व्यतिरिक्त जिल्ह्यातील दिव्यांगांना विविध प्रकारची मदत करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 50 लाख रुपये निधीची तरतूद करणार असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितले. जि.प. सेस 5 टक्के निधीचे नियंत्रण करण्यासाठीच्या जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये संपन्न झाली. त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, अपर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत बुधावले यासह समितीचे अशासकीय सदस्य उपस्थित होते.
गरज असलेल्या दिव्यांगांना मदत करण्यासाठी निधीची तरतूद करण्याच्या सूचना देऊन पालकमंत्री उदय सामंत पुढे म्हणाले की, जिल्हास्तरीय समितीकडे प्राप्त झालेले सर्व प्रस्ताव आजच्या बैठकीमध्ये समितीसमोर ठेवण्यात आले आहेत. यावर समितीने योग्य तो निर्णय घ्यावा. दिव्यांगांच्या मदतीसाठीचे नियोजन करण्यात यावे. तसेच दिव्यांगासाठी असलेल्या निधीमध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत अशा सूचना पालकमंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिल्या.
यावेळी बैठकीमध्ये विविध योजनांसाठी एकूण 1 हजारपेक्षा जास्त प्रस्ताव सादर करण्यात आले असल्याचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी यांनी सांगितले. तसेच एकूण 41 लाख 20 हजार 850 रुपयांचा निधी आहे. त्यापैकी सार्वजनिक इमारतींना रॅम्प बांधणेसाठी 95 हजार रुपये, जनजागृतीसाठी 50 हजार, अस्थिव्यंग व्यक्तींसाठी स्वयंचलीत तीन चाकी सायकलसाठी 20 लाख, पिठाची गिरणी देण्यासाठी 1 लाख, दिव्यांगासाठी घरकूल योजनेसाठी 9 लक्ष, कुकट पालनासाठी 2 लाख अशा प्रकारे निधी असल्याचे समाज कल्याण अधिकारी यांनी सांगितले.