*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा मुल्हेरकर यांची गौरी आगमनाच्या निमित्ताने लिहिलेली अप्रतिम काव्यरचना*
*गौराई आली ग*
सोनपाऊली आली आली
गौराई आली, आली महालक्ष्मी आली।।
घाटावरुनी येता येता
काय तिने आणिले
धन धान्य सोने नाणे
वैभव सारे दिले
घरीदारी अहा किती ही समृद्धी आली
आली महालक्ष्मी आली।।१।।
वर्षाचा हा सण गौरीचा
मुखवटे सजविले
भाळी कुंकूम गळा कृष्णमणी
गौरीच्या शोभले
तेज मुखावर रवि शशीचे आनंदाने न्हाली
आली गौराई आली।।२।।
धान्य साळीचे सोळा भाज्या
पुरणपोळीचा घास
सोळा चटण्या ताट भरले
नैवेद्यासी खास
सेवाभावे गौरीमाता तृप्त अती झाली
आली महालक्ष्मी आली।।३।।
जमल्या अवघ्या सुवासिनी
नटुनी थटुनी छान
उत्सव चाले उमा गौरीचा
दिधले सौभाग्याचे वाण
खेळ खेळुनी रात्र सारी हर्ष्ये जागविली
आली गौराई आली।।४।।
तिसरे दिवशी निघाली माता
परतुनी तिचिया घरी
ओटी भरली आरती केली
दही भाताची शिदोरी
साश्रूनयनी निरोप देतो आई आता निघाली
पुढील वर्षी लवकरी येई गौराई चालली।।५।।
*अरूणा मुल्हेरकर*
मिशिगन, अमेरिका