You are currently viewing नारायण राणेंच्या निशाण्यावर ठाकरे सरकार…

नारायण राणेंच्या निशाण्यावर ठाकरे सरकार…

ठाकरे नक्की करतात तरी काय?…

कुडाळ येथील कोकोनट हॉटेलमध्ये खासदार नारायण राणे हे प्रसार माध्यमांना सामोरे गेले. आपल्या बेधक पत्रकार परिषदेत त्यांनी ठाकरे सरकार आणि त्यांच्या धोरणांवर टीकास्त्र सोडले. भाजपचे राज्यसभा खासदार असलेले नारायण राणे यांनी राज्यातील सरकारच्या उणिवा दाखवताना जनहितासाठी ठाकरे सरकार योग्य नाही असे सांगितले तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि एकेकाळी राष्ट्रवादीच्याच दीपक केसरकर यांच्या विरोधात शरद पवारांकडे तक्रार करून मदत घेतलेल्या राष्ट्रवादीवरही परखड मत मांडून नाराजी व्यक्त केली.
केंद्र सरकारच्या विरोधात परखड मत मांडणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्ला बोल करताना, “धमक्या देण्यापेक्षा राज्यासाठी काम करावे” असे सांगतानाच ठाकरेंच्या मुलाने आपले मैत्रीचे संबंध जोपासताना जनतेने निवडून दिलेल्या कामांचा विचार करावा न की गुन्ह्यांमध्ये गोवून घेण्याचा असे परखडपणे बोलून सुशांतसिंग व दिशा पटाणी यांच्या आत्महत्येच्या विषयावर निशाणा साधत ठाकरेंवर टीका केली.
कोरोनाच्या काळात घरात राहून राज्य चालवणारा पहिलाच मुख्यमंत्री अशी खिल्ली उडवताना जनतेच्या भल्यासाठी, मराठा आणि हिंदुत्व या विषयांसाठी ठाकरे सरकारने काहीच न करता फुकाच्या वार्ता केल्याचा दावा राणे यांनी केला. संजय राऊत यांच्यावरही राणेंनी तोंडसुख घेतलं. “आपल्या पदरात काहीतरी पाडून घेण्यासाठीच संजय राऊत सरकार मधील कोणावरही टीका झाली तरी उत्तर देत असतात” अशी बोचरी टीका त्यांनी संजय राऊत यांच्यावर केली.
ज्या शिवसेना पक्षापासून राजकारणाची सुरुवात केली त्याच पक्षाचे मुख्यमंत्री असलेल्या उद्धव ठाकरे यांच्यावर अतिशय खालच्या पातळीवर बोलताना “कोणत्याही विषयाचे ज्ञान नसलेला नेता राज्य सरकारला लाभलेला असून तेवढी नैतिक पात्रताही त्यांच्याकडे नाही असेही राणे म्हणाले. आपल्या पक्षातील आमदारांना ईडी च्या विळख्यातून सोडवता येत नाही आणि “योग्य कारवाई न झाल्यास आम्ही हात धुवून मागे लागू, आम्ही हे करू ते करू” असे म्हणणारे ठाकरे नक्की करतात तरी काय? असा प्रश्न उपस्थित करत नारायण राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला.
सरकार वर टीकास्त्र सोडताना बऱ्याचवेळा राणे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला. आज बाळासाहेब असते तर सत्तेची चावी उद्धव ठाकरे यांच्या हाती दिलीच नसती असे राणे यांनी पत्रकार परिषदेत ठामपणे सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी केंद्राने दिलेल्या निधीला ठाकरे सरकारने अजून उत्तर न दिल्याचे सांगत आपण कोणाला घाबरत नसून आपल्यावर काही केलात तर पळता भुई करून सोडू असा इशारा नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.
एकंदरीत संपूर्ण पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी ठाकरे आणि ठाकरे सरकार यांच्यावरच टीकास्त्र सोडले. त्यामुळे भाजपाचे राज्यातील सरकारच्या विरोधात असलेलं मत नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेतून प्रकर्षाने दिसून आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा