कणकवली बस स्थानकातील दुरावस्थेचे काम पूर्ण न झाल्यास युवासेनेमार्फत आंदोलन
युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांचा इशारा
कणकवली
येत्या दोन दिवसात कणकवली बस स्थानकातील दुरावस्थेचे काम पूर्ण न झाल्यास युवासेनेमार्फत तीव्र आंदोलन छेडले जाईल. सर्वसामान्य जनतेला गणेश चतुर्थीपूर्वी खड्डेमुक्त बसस्थानक मिळाले पाहिजे. अन्यथा गय केली जाणार नाही असा देखील इशारा
युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिला. यावेळी जोपर्यंत ठेकेदाराकडून निविदे प्रमाणे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत ठेकेदाराचे बिल अदा करू नये. तसेच केवळ दिखाऊपणा पुरते काम न करता एसटीच्या अधिकाऱ्यांनी जातीनिशी येथे थांबून काम करून घ्या. अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली.
कणकवली येथील बस स्थानकाच्या दुरावस्थेबाबत युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी कणकवली तेथील एसटीच्या अभियंत्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली.या भेटी प्रसंगी त्यांच्यासोबत युवा सेना तालुकाप्रमुख उत्तम लोके, उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, शहर प्रमुख प्रमोद शेठ मसुरकर, विभाग प्रमुख अनुप वारंग, मुकेश सावंत, राजू राठोड, रिमेश चव्हाण, नितेश भोगले, संतोष सावंत, महेश कोदे, सिद्धेश राणे, ललित घाडीगावकर, एसटीचे अभियंता अक्षय केंकरे आदी उपस्थित होते.
गेल्या पन्नास वर्षांमध्ये कणकवली बस स्थानकाच्या इमारतीचा विकास झालेला नाही. पालकमंत्री म्हणून राहिलेल्या नारायण राणे यांना देखील हे काम करता आले नाही. तर आमदार नितेश राणे यांनी गेल्या नऊ वर्षात केवळ राज्यभर बोंब मारण्याचे काम केले परंतु यामध्ये त्यांना कणकवली सह देवगड वैभववाडी या बस स्थानकांचा देखील विकास करता आलेला नाही. त्यामुळे राज्यभर बोंबाबोंब करत फिरण्यापेक्षा मतदारसंघातील सर्वसामान्य जनते करता वापरात येणाऱ्या बस स्थानकांच्या विकासाकडे लक्ष द्या. असा टोला युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी आमदार नितेश राणे यांना लागवला.
याप्रसंगी ठेकेदार याच्याकडून एसटीची वाहतूक बस स्थानकामध्ये सुरू असल्याने सकाळच्या सत्रात काम करता येत नसल्याचे सांगितले. मात्र हे शासकीय काम आहे. लोकांच्या सेवेसाठी काम झाले पाहिजे. कारणे चालणार नाहीत. रात्रीच्या वेळी काम सुरू करा. अधिकाऱ्यांना उपस्थित राहायला सांगा. मात्र हलगर्जीपणा होता नये. गणेश चतुर्थी काळात लोकांना त्रास झाला तर शिवसेना स्टाईल दाखवू असा इशारा देखील यावेळी दिला गेला. आमदार वैभव नाईक यांच्या मतदारसंघातील बस स्थानकांची कामे आमदार नितेश राणे यांनी पहावीत. व आपल्या मतदारसंघातील बस स्थानकांची अवस्था पहावी. लोकांना सोय देण्याऐवजी इतरत्र फिरणे बंद करा. असा टोला देखील नाईक यांनी लगावला.