इचलकरंजी : प्रतिनिधी
शिक्षक हा सर्वगुणसंपन्न असतो. तो आपले ज्ञान विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे देत असतो. मुलांना सर्व गोष्टी आल्या पाहिजेत, यासाठी तो दिवस रात्र मेहनत करत असतो. मुलांनी नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी सदैव तयार असले पाहिजे. विद्यार्थी हा त्याच्या गुरुवर अवलंबून असतो. त्यामुळे शिक्षकाला नेहमी प्रेरणा दिली पाहिजे आणि पुरस्कारामुळे त्याला प्रेरणा मिळत असते म्हणून रोटरीतर्फे ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ देऊन शिक्षकांना सन्मानित करण्यात येते , अशा आशयाचे उदगार रोटरी प्रांत ३१७० चे प्रांतपाल नासिर बोरसादवाला यांनी काढले.
येथील रोटरी क्लब इचलकरंजी सेंट्रल, रोटरी क्लब इचलकरंजी टेक्स्टाईल सिटी, रोटरी क्लब इचलकरंजी एक्झिक्युटिव्ह, आणि रोटरी क्लब ऑफ अतिग्रे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘नेशन बिल्डर अवॉर्ड’ या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत रोटरी टेक्स्टाईल सिटीचे अध्यक्ष राजेंद्र जैन यांनी केले तर प्रास्ताविक रोटरी एक्झिक्युटिव्हचे सेक्रेटरी शितल उपाध्ये यांनी केले. पाहुण्यांची ओळख रोटरी सेंट्रलचे अध्यक्ष नितीनकुमार कस्तुरे यांनी करून दिली. या कार्यक्रमाप्रसंगी डिस्ट्रिक्ट लिटरसी कमिटीचे चेअरमन डॉक्टर प्रशांत कांबळे व यतीराज भंडारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी जितेंद्र अनुसे तारदाळ, विनोद निपासले, अरुण भागवत, विष्णू निकम, निशा सूर्यवंशी, प्रसाद रानडे, सविता कोळी, अर्चना चौगुले, विलास पाटील, नंदादेवी नांद्रे, संगीता पवार, अनिता कागले, सिद्धनाथ बसागरे, उत्तम मेंगणे, अर्चना भोसले, भारत भोई, सीमा शेडबाले, संजय जाधव, वैशाली तळेकर, डॉ. सौ. दिपाली निकम (काळे) आणि राजेंद्र कराळे या शिक्षकांना सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार रोटरी अतिग्रे क्लबचे अध्यक्ष सचिन चौगुले यांनी व्यक्त केले तर सूत्र संचालन प्रा. अमर कांबळे व गिरीष कुलकर्णी यांनी केले. येथील ब्लड बॅंकेत झालेल्या कार्यक्रमास शिक्षक, रोटरी क्लबचे सदस्य व निमंत्रित मोठ्या संख्येने उपस्थित होते.