नागरिकांनी उपस्थित रहाण्याचे नासीर काझी यांचे आवाहन.
वैभववाडी
कोरोना काळातील वीज बिले माफ करा, चाळण झालेल्या तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची त्वरित डागडुजी करा. यासह अन्य विविध मागण्यांसाठी भाजपाच्या वतीने गुरुवार दि. 26 नोव्हेंबर रोजी ठिय्या आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होणार आहे. जनतेचे मूलभूत प्रश्न, समस्या व मागण्या मार्गी लागण्यासाठी होणाऱ्या या आंदोलनात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन वैभववाडी तालुकाध्यक्ष नासीर काझी यांनी केले आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार रामदास झळके यांना काझी यांनी दिले आहे.
तालुक्यात तरेळे – गगनबावडा, फोंडा – उंबर्डे, भुईबावडा – जांभवडे, खारेपाटण – गगनबावडा हे चार प्रमुख रस्ते आहेत. परंतु हे चारही रस्ते वाहतुकीस अत्यंत धोकादायक बनले आहेत. या रस्त्याने पायी चालणेही मुश्कील झाले आहे. या मार्गावरून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्यावर वारंवार अपघातांची मालिका सुरू आहे. रस्त्याची डागडुजी करण्यात यावी यासाठी भाजपच्या वतीने लेखी पत्रव्यवहार यापूर्वी अनेकदा करण्यात आला आहे. परंतु याकडे संबंधित विभागाने जाणून बुजून दुर्लक्ष केले आहे. इतर मागण्या पुढील प्रमाणे तालुक्यातील मंजूर विकास कामांना दिलेली स्थगिती तात्काळ उठविण्यात यावी. तालुक्यातील सर्व शासकीय रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी, जलसंधारण विभागातील प्रलंबित प्रकल्प त्वरित सुरू करण्यात यावे, अरुणा प्रकल्पग्रस्तांची पुनर्वसन कामे पूर्णता मार्गी लावण्यात यावी, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम त्वरित सुरू करण्यात यावे, कोरोना काळात बंद असलेल्या लांब व जवळ पल्ल्याच्या एसटी गाड्या तात्काळ सुरू करण्यात याव्यात, तालुक्यातील शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन त्वरित जोडण्यात यावे, कोरोना काळातील वीज बिले त्वरीत माफ करण्यात यावीत, उंबर्डे मेहबूबनगर हा महसुली गाव नवीन कोळपे सजाला जोडण्यात आलेला आहे. तो तात्काळ रद्द करण्यात यावा, आधार कार्ड सुविधा तालुका मुख्यालयात तात्काळ उपलब्ध करण्यात यावी, या मागण्यांचा समावेश आहे. अशा विविध मागण्यांसाठी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन छेडणार आहे.