You are currently viewing गेला महिनाभर रेल्वे कडून प्रवाशांचे मेगा हाल सुरूच !

गेला महिनाभर रेल्वे कडून प्रवाशांचे मेगा हाल सुरूच !

मुंबई:

 

मुंबईकरांना कोणी वाली नाही. अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली असून सध्या मुंबईत पाऊस नसताना रेल्वे स्थानकावर गर्दीने प्लॅटफॉर्म भरलेले दिसून येताना दिसत आहेत. पूर्ण महिनाभर नेहमीचं पंधरा ते वीस मिनिटे गाड्या उशिराने धावत असल्याने वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यात कित्येक प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले आहे. रेल्वेचे वेळापत्रक रोजचं कोलमडून पडले आहे. रेल्वे सेवा सुरळीत चालू राहावी यासाठी दर रविवारी मेगा ब्लॉक घेऊन गाड्या वेळत धावतील अशी अपेक्षा असताना आठवड्याच्या पहिल्याच सोमवारी मेगा हाल सुरू झालेले असतात. ते थांबवा अशी म्हणायची वेळ आली आहे. दरम्यान प्रथम फलकावर गाडी लावली जाते आणि अचानक सदर गाडी आज रद्द करण्यात आली आहे असे जाहीर करून प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळले जाते. मग होणाऱ्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिर आहोत हे ऐकून प्रवाशांना आता खरंच कंटाळा आला असून या अनियमित सेवेवर कायमची उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. या रोजच्या रडगाण्याला प्रवाशी वर्गाकडून विचारणा होऊ लागली आहे. आम्हाला यातून दिलासादायक प्रवास मिळणार आहे का? अशा प्रसंगी रेल्वेचा अधिकारी वर्ग परिस्थितीला सामोरे जात नसल्याने यांना सुख दुःख नसल्याचे स्पष्ट होते. फक्त ध्वनीक्षेपकावरून तांत्रिक कारण पुढे करून विलंबाने गाड्या धावतील एवढे सांगितले की, आपली जबाबदारी संपली. त्यामुळे रोज मरे त्याला कोण रडे अशी अवस्था प्रवाशांची झाली आहे. यावर कळस म्हणजे एक दिवस रेल्वेतून प्रवास करून दाखवण्याऱ्या लोक प्रतिनिधींनी मुंबईकर जनतेला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत आहे.

 

– प्रमोद कांदळगावकर, भांडुपगाव

प्रतिक्रिया व्यक्त करा