किल्ले सिंधुदुर्ग सफर १ सप्टेंबर पासून सुरू
किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारासह तटबंदीची होणार दुरुस्ती ; पुरातत्व विभागाची माहिती
मालवण
पावसाळी बंदी कालावधी नंतर १ सप्टेंबर पासून नव्या पर्यटन हंगामास सुरवात होत आहे. ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग दर्शन प्रवासी होडी वाहतूक सुरू होणार असल्यामुळे पर्यटकांची प्रतीक्षा संपणार आहे. दरम्यान सिंधुदुर्ग किल्याच्या डागडुजीचे काम पुरातत्त्व विभागाने हाती घेतले आहे. किल्याचा महादरवाजा, दिंडी दरवाजा, ढासळलेली तटबंदी आणि त्यावरील पायवाट, किल्ल्यावरील पायवाटा आदी कामांची प्रामुख्याने दुरुस्ती होणार आहे. तटबंदीवरील झाडी सफाईचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. अशी माहिती पुरातत्व विभाग अधिकारी वैभव बेटकर यांनी दिली.
सिंधुदुर्ग किल्याचा महा दरवाजा कालौघात जीर्ण झाला आहे. हा दरवाजा बदलून नवीन दरवाजा बसविण्याची प्रस्ताव पुरातत्त्व विभागा समोर आहे. यानुसार किल्याचा महादरवाजा, त्यामधील दिंडी दरवाजा पूर्णतः बदलून नवीन दरवाजा बसविण्यात येणार आहे. नवीन दरवाजा तयार करताना जुन्या दरवाजाची हुबेहूब प्रतिकृती असेल याची काळजी घेतली जाणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.
१ सप्टेंबर पासून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या परवानगीने तसेच सागरी हवामानाचा अंदाज घेऊन किल्ले प्रवासी होडी वाहतूक सुरू होणार आहे. प्रवासी होडी वाहतूक डागडुजी कामानाही वेग आला आहे. मालवणात पर्यटन सफरीवर येणाऱ्या पर्यटकांचे किल्ले सिंधुदुर्ग हे खास आकर्षण आहे. समुद्रातील होडी प्रवास स्मरणीय असतो. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक किल्ले सिंधुदुर्गला भेट देतात.
सागरी पर्यटनास सुरवात
सागरी पर्यटनास अर्थात स्कुबा डायव्हीग, पॅरासेलिंग, वॉटर स्पोर्ट्स बोटिंग सफर आदी जल पर्यटनाला ही १ सप्टेंबर पासून परवानगी प्राप्त होते. परवानगी व सागरी हवामान याचा अंदाज घेत मालवणचे पर्यटन बहरणार आहे.