*केंद्र व राज्य सरकारने विम्याचे हप्ते न भरल्याने आंबा, काजू बागायतदार नुकसान भरपाई पासून वंचित*
*१५ दिवसांत पीक विमा नुकसान भरपाई न मिळाल्यास १२ सप्टेंबर रोजी शिवसेना छेडणार आंदोलन*
*आमदार वैभव नाईक व माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचा इशारा*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदार शेतकऱ्यांनी २०२१-२२ मध्ये पीकविमा उतरविला होता.त्याअंतर्गत १ डिसेंबरपासून विमा संरक्षणाचा कालावधी सुरू झाला. हा कालावधी १५ मे पर्यंत होता. पिक विम्याचा कालावधी संपल्याच्या ४५ दिवसानंतर अर्थात १ जुलैच्या दरम्याने पीक विमा नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांना देणे गरजेचे होते. मात्र आता ऑगस्ट महिना संपत आला तरी देखील शेतकऱ्यांना हि रक्कम मिळालेली नाही.केंद्र व राज्य सरकराने विमा कंपन्यांचे विम्याचे हप्ते न भरल्याने नुकसानीची रक्कम देण्यात आलेली नाही. येणाऱ्या १५ दिवसांत हि रक्कम शेतकऱ्यांना न मिळाल्यास १२ सप्टेंबर २०२३ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधिक्षक यांच्या कार्यालयावर धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार वैभव नाईक व माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिला आहे.
पीक विम्याच्या कालावधीत डिसेंबर मध्ये जोरदार पाऊस झाला. त्यामुळे आंबा, काजूला आलेल्या मोहोराचे सुरुवातीला नुकसान झाले. त्यानंतर सातत्याने ढगाळ वातावरण, काही भागात गारपीट, अवकाळी पाऊस पडत राहिला. तापमानदेखील अनेकदा ३७ अंश सेल्सिअस पेक्षा वाढले. त्यामुळे आंबा, काजू बागायतदारांचे मोठे नुकसान झाले आहे. तर फोंडाघाट, कुडाळ, आजगाव, सावंतवाडी, बिबवणे, तळेबाजार, माळगाव, वेंगुर्ला, म्हापण याठिकाणी असलेली हवामान केंद्रे तांत्रिक दृष्ट्या अयोग्य ठिकाणी असल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हात सर्व ठिकाणी समान वातावरण असताना देखील हि केंद्रे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे हवामान दाखवत आहेत. त्यामुळे अनेक पीक विमा धारक बागायतदार शेतकरी नुकसान भरपाई पासून वंचीत राहिले आहेत. नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीप्रमाणे पीक विमा नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आ. वैभव नाईक व सतीश सावंत यांनी केली आहे अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.