सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बंद असलेले सीसीटीव्ही तात्काळ सुरू करा…
राष्ट्रवादीची मागणी; नव्याने दिडशेहून अधिक ठिकाणी सीसीटिव्ही बसविणार, पोलिस अधिक्षकांची माहिती…
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी असलेले तसेच पर्यटन स्थळावर असलेले अनेक सीसीटीव्ही बंदावस्थेत आहेत. त्यामुळे त्यांचे तात्काळ ऑडीट करुन ते पुन्हा सुरू करण्यात यावेत, अशी मागणी महिला राष्ट्रवादीच्या माध्यमातून सौ. अर्चना घारे यांनी पोलिस अधिक्षकांकडे केली आहे. दरम्यान सुरक्षेचा भाग लक्षात घेता जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आणखी काही कॅमेर्यांची गरज आहे. त्यामुळे नव्याने दिडशेहून अधिक कॅमेरे लावण्यासाठी आवश्यक ती उपाययोेजना करण्यात आली आहे. लवकरच याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे, असे आश्वासन पोलिस अधिक्षकांनी दिले.
राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी आज पोलिस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष ॲड .रेवती राणे, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, वेंगुर्ला तालुकाध्यक्ष योगेश कुबल, युवती जिल्हाध्यक्ष सावली पाटकर, सावंतवाडी महिला शहराध्यक्ष ॲड. सायली दुभाषी, सावंतवाडी तालुका युवक उपाध्यक्ष विवेक गवस, तालुका चिटणीस समीर सातार्डेकर, अल्पसंख्याक सेल महिला तालुकाध्यक्ष मारिता फर्नांडिस, अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष इफ्तिकार राजगुरू, सोशल मिडिया जिल्हाध्यक्ष सचिन पाटकर, गौरांग शेर्लेकर, वैभव परब, शेखर परब, प्रकाश म्हाडगुत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी अधिक्षकांना निवेदन दिले आहे. त्यात असे म्हटले आहे की, तळकोकणातील सावंतवाडी व वेंगुर्ला ही शहरे पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहेत. समुद्र किनारपट्टी लाभल्याने निसर्ग सौंदर्याने नटलेली ही शहरे देश विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत. दररोज हजारो पर्यटक या शहरांना भेट देत असल्याने येथील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. मात्र सावंतवाडी शहरातील नागरिकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेरा पैकी तब्बल ५१ कॅमेरे व वेंगुर्ला तालुक्यातील अनेक किनारपट्टीवरील कॅमेरे बंद आहेत. नागरिकांची व पर्यटकांची सुरक्षा अबाधित राहावी यासाठी सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे लवकरात-लवकर मेंटेनन्स ऑडिट करावे व नादुरुस्त असलेले सीसीटीव्ही कॅमेरे लवकरात लवकर दुरुस्त करावेत, अशी मागणी आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या कोकण विभागीय अध्यक्ष अर्चना घारे यांनी सिधुदुर्ग जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांच्याकडे केली. यावेळी त्यांनी सीसीटीव्ही च्या मेंटेनन्स ऑडिट सह १५० अतिरिक्त सीसीटीव्ही कॅमेरे प्राधान्याने बसवण्याचे आश्वासन दिले.