You are currently viewing माजी नगराध्यक्ष संजू उर्फ सच्चिदानंद परब वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

माजी नगराध्यक्ष संजू उर्फ सच्चिदानंद परब वाढदिनी शुभेच्छांचा वर्षाव

*कार्यकर्त्यांचा ओघ पाहता संजू परब विधानसभेचे प्रबळ दावेदार*

 

सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांचा वाढदिवस १९ ऑगस्टला मोठ्या दिमाखात साजरा झाला. रामेश्वर प्लाझा सावंतवाडी येथील संजू परब यांच्या संपर्क कार्यालया समोर मंडप उभारण्यात आला होता आणि या मंडपातच दरवर्षीप्रमाणे संजू परब यांचा वाढदिवस केक कापून मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकारत साजरा झाला. वाढदिनी संजू परब यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार राजन तेली जिल्हातील अनेक लोकप्रिनिधी, जिल्हाभरातील अनेक कार्यकर्ते, चाहता वर्ग आणि मतदार उपस्थित राहिले होते. सकाळपासून सुरू झालेला संजू परब यांचा वाढदिवस सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत शुभेच्छा स्वीकारत रात्रीपर्यंत सुरू होता.

सावंतवाडी नगरपालिकेवर एक हाती सत्ता मिळवून संजू परब यांनी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवत भविष्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा भावी आमदार म्हणून आपले नाव घेण्यास भाजपा नेतृत्वाला मजबूर केले होते. त्यांच्या कार्याचा धडाका पाहता सावंतवाडी मतदारसंघातील भावी आमदार म्हणून संजू परब यांच्याकडेच पाहिले जात होते. सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला विधानसभा मतदारसंघावर गेली दीड दशके दीपक केसरकर यांचा एक हाती वरचष्मा आहे. मागील दोन टर्म मध्ये कणकवली येथील रहिवासी असणारे भाजपाचे माजी आमदार राजन तेली यांनी दोन टर्म मध्ये दीपक केसरकर यांच्या विरोधात विधानसभा लढवली परंतु राजन तेली हे कणकवली येथील रहिवासी व स्थानिक नसल्याने लोकांनी त्यांना स्वीकारले नाही. त्यामुळे भविष्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी संजू परब यांना पुन्हा एकदा संधी चालून आली आहे. संजू परब यांच्या वाढदिनी झालेली गर्दी पाहता संजू परब यांच्या पाठीशी पक्षाचे कार्यकर्ते आणि मतदार असल्याचे जाणवत आहे. त्यामुळे आमदारकीचे स्वप्न उराशी बाळगून मित्र पक्षाचे मंत्री असलेले नाम. दीपक केसरकर यांच्या कार्यपद्धतीवर केवळ तोंडसुख घेऊन टीका करणारे राजन तेली यांना सावंतवाडीतून पक्षाची उमेदवारी मिळणार की स्थानिक असलेले भाजपा प्रवक्ते संजू परब यांना पक्ष बळ देणार..? हे त्या काही दिवसातच समजून येईल.

मागील विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राजन तेली यांचा मतदारसंघातील संपर्क कमी झाला होता. अलीकडेच पुन्हा त्यांनी मतदारसंघात संपर्क वाढविला आहे. एकंदर पाहता सावंतवाडी दोडामार्ग वेंगुर्ला मतदार संघातून राजन तेली यांना बऱ्यापैकी मतदान झाले होते. परंतु दीपक केसरकर यांची जनमानसात असलेली प्रतिमा हीच केसरकर यांचा आधार बनली आणि दीपक केसरकर दहा हजाराच्या फरकाने निवडून आले होते. नाम.दीपक केसरकर यांची जनमानसातील हीच प्रतिमा पुसून काढण्यासाठी केसरकर यांच्या कार्यपद्धतीवर टीकेची झोड उठवीत राजन तेली यांनी मतदार संघात केसरकर कसे अपयशी ठरत आहेत एवढेच दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु हा प्रयत्न करताना मतदार संघासाठी सत्ता असताना आपण काय केले आणि काय करत आहोत..? हे दाखविल्याचे कुठेही दिसत नाही. भाजपाचे जिल्हाध्यक्ष असेपर्यंत राजन तेली यांनी अधिकार असूनही मतदारसंघात उल्लेखनीय असे कोणतेही कार्य केले नाही. कालच झालेल्या आडाळी एमआयडीसी प्रकरणी लॉंग मार्च मोर्चामध्ये सत्ताधारी असूनही सहभागी होत जनतेचा कळवळा असल्याचे त्यांनी दाखवून दिले. परंतु याच आडाळी एमआयडीसीमध्ये सत्ताधारी पक्षात असूनही का उद्योगधंदे आले नाहीत? याचे मात्र उत्तर सत्ताधाऱ्यांकडे नव्हते. परवाच झालेल्या संजू परब यांच्या वाढदिनी कमालीची गर्दी झाली आणि संजू परब हे पुन्हा एकदा चर्चेत आले. दानशूर व्यक्तिमत्त्वामुळे संजू परब यांच्या वाढदिवसानिमित्त लक्षणीय अशी उपस्थिती दिसून आली. राजन तेली हे कणकवलीतील असल्याने मागील दोन्ही विधानसभा निवडणुकांमध्ये त्याचा त्यांना फटका बसला. संजू परब यांचे ग्रामीण भागात असणारे भक्कम नेटवर्क, दोडामार्ग वेंगुर्ला या ठिकाणी असलेला जनसंपर्क पाहिला असता संजू परब यांना येत्या निवडणुकीत विधानसभा उमेदवारीची लॉटरी लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा