ग्राहक पंचायतची वैभववाडी प्रशासनाकडे मागणी.
वैभववाडी
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वैभववाडी प्रशासनाने जनजागृती अभियान राबवून मास्क वापरणे व शारिरीक अंतर पाळण्याबाबत जनतेला आवाहन करावे. तसेच सार्वजनिक आरोग्याच्यादृष्टीने नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग,सिंधुदुर्ग जिल्हा शाखा आणि वैभववाडी तालुका शाखेच्यावतीने मा.तहसिलदार वैभववाडी यांच्याकडे मेलव्दारे केली आहे.
मार्च २०२० पासून कोरोना महामारीने संपूर्ण मानव जातीला वेठीस ठरले आहे. यामध्ये जीवित हानीसह मोठ्या प्रमाणावर आर्थिक हानी झालेली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनाने योग्य खबरदारी घेतल्याने जिल्ह्यात कोरोनावर योग्य नियंत्रण ठेवणे शक्य झालेले आहे. वैभववाडी तालुक्याचा विचार करता प्रशासनाने घेतलेली योग्य खबरदारी आणि जनतेने केलेल्या सहकार्यामुळे कोरोना आटोक्यात राहिलेला आहे. त्याबद्दल प्रशासनासह जनतेचे आभार व्यक्त करीत आहोत.
परंतु आता कोरोना महामारीची दुसरी लाट येण्याची भिती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून वैभववाडी प्रशासनाच्यावतीने तालुक्यातील सर्व नागरिकांना मास्कचा सक्तीने वापर करणे आणि शारीरिक अंतर ठेवण्यासंदर्भात आपल्याकडून योग्य प्रसार माध्यमांव्दारे जनजागृती केल्यास जनतेचा प्रतिसाद नक्की मिळेल. आपल्या सूचना व नियमांची अंमलबजावणी न करणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई झाल्यास भविष्यात उद्भवणाऱ्या समस्येवर नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे. आम्ही ग्राहक पंचायत महाराष्ट्र-कोकण विभाग,सिंधुदुर्ग जिल्हा आणि वैभववाडी तालुका शाखेच्यावतीने विनंती करीत आहोत की, मा.तहसीलदार कार्यालय वैभववाडी, आरोग्य विभाग वैभववाडी, पोलीस ठाणे वैभववाडी आणि नगरपंचायत वाभवे-वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने सामूहिक जनजागृती अभियान राबवून मास्क न वापरणा-या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई केल्यास सर्व नागरिक मास्कचा वापर करतील, नियमांचे पालन करतील. जेणेकरून सर्वसामान्य लोकांचे या कोरोना महामारीपासून बचाव होण्यास मदत होईल अशी विनंती जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची अशासकीय सदस्य व ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. एस.एन.पाटील, जिल्हा संघटक एकनाथ गावडे, कोषाध्यक्ष संदेश तुळसणकर तसेच वैभववाडी तालुका संघटक शंकर स्वामी यांच्यावतीने केली आहे.