You are currently viewing आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे चिंदर गावातील गुरे दगावलेल्या पशुपालकांना मिळणार आर्थिक मदत

आ. वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे चिंदर गावातील गुरे दगावलेल्या पशुपालकांना मिळणार आर्थिक मदत

ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आर्थिक मदत देण्याचे केले मान्य; कार्यवाही सुरू

विभागप्रमुख समीर लब्दे,अनिल गावकर, पप्पू परुळेकर यांची माहिती

लंम्पी आजारात पशु दगावलेल्या पशुपालकांना ज्याप्रमाणे शासनाने आर्थिक मदत केली त्याच धर्तीवर शासनाने मालवण तालुक्यातील चिंदर गावात अज्ञात आजाराने गुरे दगावलेल्या पशुपालकांनाही नुकसान भरपाई द्यावी यासाठी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून चिंदर गावातील गुरे दगावलेल्या पशुपालकांना नुकसान भरपाई देण्याचे ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मान्य केले आहे. त्याबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.अशी माहिती शिवसेना आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, उपविभाग प्रमुख अनिल गावकर, चिंदर ग्रा.प. सदस्य केदार (पप्पू) परुळेकर यांनी दिली आहे.

मालवण तालुक्यातील चिंदर गावात साथसदृष्य आराजाने जुलै महिन्यात अचानक ९७ गुरे बाधीत होऊन त्यापैकी ४६ गुरे दगावली आहेत.पशुधन अधिकारी यांनी तपासणी करुन बुरशीजन्य विषारी पदार्थ पोटात गेल्याने ही दुरे दगावल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.याबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी विधानसभा अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता.तसेच राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडे १९ जुलै २०२३ रोजी पत्रव्यवहार करत
लंम्पी आजारात पशु दगावलेल्या पशुपालकांना ज्याप्रमाणे शासनाने आर्थिक मदत केली त्याच धर्तीवर शासनाने मालवण तालुक्यातील चिंदर गावात अज्ञात आजाराने गुरे दगावलेल्या पशुपालकांनाही नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत करावी अशी मागणी केली होती. या मागणीला ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

आ. वैभव नाईक यांच्या संदर्भीय पत्रानुसार महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव डॉ. संजय डोईजोडे यांनी राज्याच्या पशुसंवर्धन आयुक्तांशी पत्रव्यवहार करत. चिंदर गावात गुरे दगावलेल्या पशुपालकांना नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत देण्याबाबत अभिप्राय शासनास सादर करावेत अशा सूचना दिल्या आहेत. तर ना. राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आमदार वैभव नाईक यांच्याशी चर्चा करताना चिंदर येथील गुरे दगावलेल्या पशुपालकांना नुकसान भरपाई देण्याचे मान्य केले आहे. त्यामुळे आ.वैभव नाईक यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. अशी माहिती शिवसेना आचरा विभाग प्रमुख समीर लब्दे, उपविभाग प्रमुख अनिल गावकर, चिंदर ग्रा.प. सदस्य केदार (पप्पू) परुळेकर यांनी देत शिवसेना पक्षाच्या माध्यमातूनही नुकसानग्रस्तांना आर्थिक मदत देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा