गणेश उत्सवासाठी सिंधुदुर्गात आलेले चाकरमानी आता मोठ्या संख्येने मुंबईला परतु लागले आहेत. यावेळी चाकरमान्यांनी एसटी बसस्थानक व रेल्वेस्टेशनवर मुंबईला जाण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे बऱ्याच कालावधीनंतर बसस्थानक व रेल्वेस्टेशनचा परिसर गर्दीमुळे गजबजून गेला होता. ५ व ७ दिवसाच्या गणरायांना निरोप व तत्पूर्वी गौरी गणपतीचे विसर्जन केल्यानंतर चाकरमानी मुंबईकडे निघाले आहेत. कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर अनेक अडथळे पार करून मुंबईतून हजारोंच्या संख्येने चाकरमानी गणेशोत्सवासाठी जिल्ह्यांत दाखल झाले होते.
खाजगी गाड्या, एसटी बस, ई-पास व रेल्वे गाड्यांमधून गणेशोत्सवापूर्वी १२ ते १५ दिवस हे चाकरमानी सिंधुदुर्गात आपल्या घराघरात पोचले होते. क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मोठ्या आनंदाने गणेशोत्सवात सहभागी झाले. परंतू दरवर्षीप्रमाणे यावर्षी कोरोनामुळे काही गावांमध्ये भजने करण्यात आली नसली तरीही पारंपारिक पद्धतीने कार्यक्रमांमध्ये आरती, पूजन हे चाकरमान्यांनी अगदी भक्तिभावाने साजरे केले. गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोरोनामुळे मुंबईमध्ये अडकून असलेल्या चाकरमान्यांनी थोड्या दिवसांसाठी का होईना पण मोकळा श्वास घेतला.
गणेशोत्सवात पाचव्या-सहाव्या दिवशी गौरी-गणपती व पुन्हा सातव्या दिवशी गणरायांना निरोप दिल्यानंतर चाकरमानी आपल्या नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मुंबईला परतू लागले आहेत. ‘कोरोनाचे संकट टळू दे’ असे साकडे घालतानाच ‘पुढच्या वर्षी लवकर’ या असे म्हणत चाकरमानी मुंबईला निघाले आहेत. रेल्वेस्टेशन परिसरात व एसटी बसस्थानकात शनिवारी दुपारनंतर चाकरमान्यांनी मोठी गर्दी केली होती. एसटीबस अथवा रेल्वेगाडी मुंबईच्या दिशेने रवाना होत असतानाच ‘गणपती बाप्पा मोरया’ असा जयघोष चाकरमानी करताना दिसत होते.
यावेळी रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या चाकरमान्यांची नोंदणी व तपासणी केली जात होती, तसेच एसटी बस स्थानकांवरूनही प्रवाशांच्या मागणीनुसार तातडीने गाड्या देण्यात येत होत्या. एसटी गाड्यांमधून केवळ २२ प्रवाशांना घेतले जात होते, तर रेल्वे गाड्यांमधूनही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत चाकरमान्यांसाठी व्यवस्थित बैठक व्यवस्था करण्यात आली होती.
कोकण रेल्वे मार्गावरून शनिवारी दिवसभरात चाकरमान्यांसाठी चार हॉलिडे स्पेशल गाड्या धावल्या. त्यामध्ये सावंतवाडी-अहमदाबाद गाडी सावंतवाडी येथून दुपारी १.४० वाजता निघाली होती. सावंतवाडी-लोकमान्य टिळक टर्मिनस ही गाडी संध्याकाळी ५.३० वाजता सोडण्यात आली तर सावंतवाडी-सीएसटीएम अश्या २ गाड्या सोडून पहिली गाडी सावंतवाडी येथून सायंकाळी ६.१५ वाजता तर दुसरी गाडी ८.३५ वाजता सोडण्यात आली.