वेंगुर्ला
आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी, या मातृभूमीसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणा-या शुरविरांचा सन्मान व्हावा या हेतूने ‘मिट्टी को नमन, वीरों को वंदन‘ अंतर्गत वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून आज वृक्षदिडी काढून सुमारे २०० वृक्षांची लागवड करण्यात आली.
सकाळी ८ वाजता नगरपरिषद कार्यालय, हॉस्पिटल नाका, अग्निशमन केंद्र ते कॅम्प स्टेडियमपर्यंत वृक्षदिडी काढण्यात आली. या दिडीमध्ये मुख्याधिकारी परितोष कंकाळ, माजी नगरसेवक प्रशांत आपटे, वेंगुर्ला हायस्कूल, श्री शिवाजी प्रागतिक शाळा व बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचे विद्यार्थी यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते. वृक्षदिडी कॅम्प स्टेडियम येथे पोहोचल्यानंतर त्याच ठिकाणी ‘अमृतवाटिका वृक्षारोपण‘ करण्यात आले. याठिकाणी देशी प्रजातीची जवळपास २०० वृक्षांची लागवड केली.