विठ्ठल रखुमाईच्या दरबारात रंगली “गुरुवंदना…”
युवराज लखमराजे व युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, गुरूवर्य भाई शेवडे आणि ज्येष्ठ कीर्तनकार श्रीराम दीक्षित यांच्या उपस्थितीत रंगली सुरेल मैफल.
सावंतवाडी :-
श्री सद्गगुरु संगीत विद्यालय सावंतवाडी चे गुरूवर्य श्री निलेश मेस्त्री यांच्या शिष्यपरिवार व पालकवर्गा तर्फे प्रतिवर्षी प्रमाणे “गुरुवंदना” हा कार्यक्रम रविवार दिनांक ६ ऑगस्ट २०२३ रोजी विठ्ठलमंदिर सावंतवाडी येथे प्रथम व द्वितीय सत्रांमध्ये थाटात संपन्न झाला. प्रथम सत्र सकाळी ९ वाजता ज्येष्ठ कीर्तनकार श्रीराम दीक्षित, श्री संदीप गवस, श्री दिनकर परब, श्री दादा मडकईकर, श्री संजय कात्रे, सौ उत्कर्षा मेस्त्री, श्री दत्तगुरू जोशी, श्री किशोर सावंत व गुरूवर्य श्री निलेश मेस्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन व कै. गुरूवर्य रघुनाथ (बाबी) मेस्त्री आणि कै. गुरुवर्य विठ्ठलराव पै. यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी श्री.श्रीराम दीक्षित यांनी सर्व विदयार्थी वर्गाला थोडक्यात मार्गदर्शन केले व त्यनंतर विद्यालयातील नवोदित विद्यार्थ्यांचे गायन-वादन सादरीकरण झाले. गुरुवंदना कार्यक्रमाचे औचित्य साधून ॲड. श्री बापू गवाणकर यांनी सद्गुरू संगीत विद्यालयाला हार्मोनियम भेट म्हणून दिली व सातार्डे येथील सुप्रसिद्ध हार्मोनियम मेकर श्री पंकज मेस्त्री यांचा विद्यालया तर्फे शाल श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला त्यांनतर सर्व विद्यार्थी परिवाराकडून गुरूवर्य श्री निलेश मेस्त्री व त्यांच्या सोबत सुप्रसिद्ध तबला वादक श्री किशोर सावंत यांचे गुरुपूजन करण्यात आले, त्याप्रसंगी सौ आशा मुळीक यांनी गुरुवंदना या कार्यक्रमावर व गुरूवर्य मेस्त्री सर यांच्या वर काव्य सादर केले.
सायंकाळी ठीक ४ वाजता व्दितीय सत्रास प्रारंभ झाला याप्रसंगी सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोंसले व युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले, पं. जितेन्द्र अभिषेकी बुवा यांचे शिष्य गुरूवर्य दामोदर उर्फ भाई शेवडे(धारगळ – गोवा) ज्येष्ठ रंगकर्मी वसंत उर्फ भाऊ साळगांवकर, श्री दिपक देवस्थळी, श्री अनय तूयेकर यांची विशेष उपस्थिती लाभली. सद्गुरू संगीत विद्यालयाचा विदयार्थी कु. मंगेश रामचंद्र मेस्त्री अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या विशारद या परीक्षेत संपूर्ण भारतात प्रथम क्रमांक प्राप्त केल्या बद्दल युवराज लखमराजे व गुरूवर्य भाई शेवडे यांच्या हस्ते मंगेशचा यथोचित सत्कार करण्यात आला व भाऊ साळगांवकर यांच्या हस्ते मंगेश चे वडील श्री रामचंद्र मेस्त्री यांचा सन्मान करण्यात आला.
अभिषेकी बुवा ज्या वेळी कोकणात येत असत त्या वेळी त्यांच्या सोबत निलेशजींचे वडील कै. बाबी मेस्त्री नेहमी हार्मोनियम साथीला असत, अभिषेकी बुवांची इच्छा होती की कोकणात संगीत भजना पुरते मर्यादित न राहता शास्त्रीय संगीताचा प्रचार व प्रसार या ठिकाणी व्हावा व विद्यालयाचे विदयार्थी ज्या प्रकारे शास्त्रीय गायन वादन करत आहेत ते बघता अभिषेकी बुवांची इच्छा या विद्यालयाच्या माध्यमांतून कुठे तरी पूर्ण होताना दिसतेय, सावंतवाडी येथे शास्त्रीय संगीताचे वातावरण टिकवून ते नवीन पिढी पर्यंत पोहचवण्याचे काम या विद्यालयाकडून व श्री निलेश मेस्त्री यांच्या कडून होत आहे, असेच कार्य सदैव चालू ठेवत सावंतवाडी व सिंधुुदुर्ग जिल्हयाचे नाव संगीत क्षेत्रात कायम ठेवा असे गौरवोद्गार गुरूवर्य भाई शेवडे यांनी काढले.
सद्गुरू संगीत विद्यालयाचे कार्यक्रम हे नेहमीच श्रवणीय असतात व अश्या प्रकारच्या शास्त्रीय मैफिलीचे आयोजन राजवाडा येथील दरबारहाॅल येथे विद्यालयाने करावे अश्या कार्यक्रमासाठी आपले नेहमी सहकार्य राहील असे युवराज लखमराजे व युवराज्ञी श्रद्धराजे यांनी आवाहन केले व पुढील कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.
त्यानंतर गुरूवर्य भाई शेवडे यांनी राग मारवा मध्ये विलंबित ख्याल व ताल तीनताल मध्ये ‘गुरुबिन ग्यान नही पावे’ ही बंदिश सादर करत रसिकांना खिळवून ठेवले. त्यांनतर या द्वितीय सत्रामध्ये विद्यालयातील यशस्वी व नामांकित विद्यार्थ्यांनी शास्त्रीय गायन – वादन करून मैफिल रंगवली व कार्यक्रमाच्या शेवटी श्री. विठ्ठल मंदिर देवस्थान कमिटी, निवेदक श्री संजय कात्रे, ध्वनीसंयोजक श्री हेमंत मेस्त्री यांचे आभार मानून गुरूवर्य श्री मेस्त्री यांनी हार्मोनियमवर भैरवी वादन करून कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमास जिल्ह्यातील नामवंत पखवाज वादक श्री आनंद मोर्ये, श्री कृष्णा राऊळ, श्री प्रसन्न प्रभुतेंडोलकर, श्री एच. बी सावंत, श्री चंद्रकांत घाटे, श्री प्रमोद मुंडिये, श्री किरण सिद्ध्ये, श्री अमेय गावडे, सौ. वीणा दळवी, सौ सोनल लेले, श्री मेहल कांडरकर, श्री रमेश गावडे आदी. सर्व क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी उपस्थिती दर्शवली व विद्यालयाच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या .