शासनाचे लक्ष वेधणार- भाऊ सामंत…
मालवण
तालुक्यात सुपारी उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. फळगळीचा मोठा फटका तालुक्यातील घुमडे व अन्य गावातील सुपारी उत्पादन शेतकरी व बागायतदारांना बसला आहे. यात बागायतदारांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या फळगळतीचा कृषी विभागामार्फत पंचनामा करण्यात न आल्याने बागायतदारांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
अर्धवट परिपक्व स्थितीतील फळे गळून पडत असल्यामुळे शेतकरी बागायतदारांमध्ये चिंतेची स्थिती आहे. कृषी विभागाने नुकसानग्रस्त ठिकाणी पाहणी करून कार्यवाही पंचनामा करावा यासाठी तालुका कृषी कार्यालयात शेतकऱ्यांनी भेट दिली. मात्र कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे म्हणणेही ऐकून घेतले नाही. कृषी सेवक यांनीही आम्हाला आदेश नाहीत असे सांगून अधिक गावांचा चार्ज असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे कृषी विभागाच्या कारभारावर घुमडे येथील बागायतदार भाऊ सामंत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या न्यायासाठी शासनाचे याप्रश्नी लक्ष वेधणार असल्याचे सामंत यांनी शेतकरी बागायतदार यांच्यावतीने स्पष्ट केले .
कोकणातील सुपारी हे महत्त्वाचे पीक आहे. या पिकांवर कोकणातील अनेक शेतकऱ्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. सुपारीला बाजारपेठदेखील उपलब्ध आहे. त्यामुळे या पिकावर अनेक शेतकरी अवलंबून आहेत. मात्र अवकाळी पावसाचा अथवा जास्त पावसाचा फटका या पिकाला बसत आहे. परिपक्व होण्याआधी सुपारीची गळ झाली आहे. ७० ते ८० टक्के फळांची गळ झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
सुपारी बागांमध्ये मोठ्या प्रमाणात सुपारी गळून पडत असून परिसरात सगळीकडे मोठ्या प्रमाणात नुकसान दिसून येत आहे.