*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार लिखित अप्रतिम लेख*
*बाल संगोपन ते टीन एजर्स…*
मुलांच्या व पालकांच्याही आयुष्यातील अत्यंत
नाजुक व अवघड काळ म्हणजे वरील विषय आहे.
प्रा.इरावती कर्वे प्रख्यात प्राध्यापिका व अनेक पुस्तकाच्या
लेखिका, विशेषत: मनोविश्लेषणात्मक लिहिणाऱ्या असा
त्यांचा लौकिक होता. त्यांनी फॅंन्टसीज पण बऱ्याच लिहिल्या.फॅंन्टसी म्हणजे जे प्रत्यक्षात घडू शकत नाही
ते घडलेले दाखवणे, कल्पना करणे.
या वयातील मुलांना कसे वाढवावे, त्यांचे संगोपन कसे करावे,
त्यांच्याशी कसे बोलावे हा फार मोठा प्रश्न घरोघरच्या
पालकांना पडलेला असतो. किंबहुना पालक व मुले ही या
वयात संभ्रमात असतात. गोंधळून जातात. मुलांचे वाढते वय
त्यांच्यातील हार्मोनल चेंजेस मुळे व वयात येण्याची लक्षणे
दिसू लागल्यामुळे ते एकतर लाजतात किंवा अबोल होतात.
घुमे बनतात. बोलले की तुसडे बोलतात त्यामुळे पालक
वैतागतात. मुले ह्या काळात अत्यंत अरोगंट असतात.त्या मुळे
पालकही चिडचिड करतात.
बाल मानस शास्र सांगते की ह्या वयात त्यांना प्रेमाने वागवावे,
त्यांच्या कलाने घ्यावे.पण प्रत्यक्षात अनुभव असा की मुले
अजिबात ऐकत नाहीत. म्हणून इरावती बाईंनी एक
आयरॅानिकल कथा लिहिली व मुलांच्या कलाने, मनाप्रमाणे
त्या वागू लागल्या.मुले ठेचकाळली की त्या म्हणत, अरे बाबा
जरा बघून चालत जा, पण कसले ऐकतात ते! त्यांचे
ठेचकाळणे, पडणे, गुडघे फुटणे चालूच! हळदीचा ओढा घालून त्या कंटाळल्या.
एक दिवस तर कहर झाला, त्यांची मुलगी भर रस्त्यावरून
अशी काही धावत सुटली की, एका भल्यामोठ्या लष्करी
ट्रकखाली येता येता त्यांनी तिला अक्षरश: ओढून काढली.
दैव बलवत्तर म्हणून ती वाचली. तेव्हा,
“मुले म्हणजे फुले” म्हणणाऱ्या बाल मानसशास्राची
त्यांनी यथेच्छ टिंगल उडवली. आणि मोठ्याने मुलांवर
तोंडसुख घेत घरात त्या ओरडल्या. म्हणे मुले म्हणजे फुले!
आज भल्या मोठ्या ट्रक खाली येतायेता पोर वाचली. तुम्ही
इथून पुढे असेच वागणार असाल तर सरळ तुम्हाला
होस्टेललाच पोहोचवते म्हणजे तुम्हाला शिस्त लागेल.
ताईंचे ओरडणे, राग संताप, मोठ्याने बोलणे वास्तू म्हणजे
घर ऐकत होते.घराला वाटते, ही मुले घरा बाहेर पडली तर
घराचे घरपण ते काय? गोकुळ जाईल. सारे आवाज भांडणे
बंद होतील मग आपल्याला म्हणजे घराला करमणार कसे?
मग मुले बदलत नाहीत म्हणून घराने बदलायचे ठरवले.
मुले धावत आली, ती आता टेबलावर आदळणार म्हणता
म्हणता टेबलच बाजूला सरू लागले.
आता ती भिंतीवर ठोकणार.. तेवढ्यात भिंती आत वाकू
लागल्या. इरावती बाई घराचे हे वागणे पहात होत्या.
मग त्या घरावरच कडाडल्या… अशाने मुले कशी सुधारणार?
ती जास्तच बेफाम होणार नाहीत काय? उद्या काही घडले
तर त्याला जबाबदार मग कोण? घर सारे ऐकत होते.
मग घर पूर्ववत वागू लागले व मुले ठेचकाळताच
त्यांनी शिस्तीचा बडगा उचलला व मुलांना रागावून
ओरडून प्रसंगी धपाटा घालून त्यांची चूक वेळीच लक्षात
आणून देऊ लागल्या.
बालमानस शास्र व मुलांचे प्रत्यक्ष वर्तन यात समतोल
साधता यायला हवा हेच खरे. त्या त्या प्रसंगी भले त्यांना
राग आला तरी कानउघाडणी केलीच पाहिजे त्या शिवाय
ते शिकणार कसे? मुलांना वाढवतांना साम दाम दंड भेद
या साऱ्याच युक्त्या वेळोवेळी वापराव्या लागतात त्या
शिवाय मुले वठणीवर येत नाहीत.
खरे म्हणजे मुले बालपणापासूनच आई वडिलांची कॅापी
करतात. अनुकरण करतात, म्हणून आपले वर्तन चोख
असेल तर मुलांवर आपोआप चांगले संस्कार होतात.
मुले कुणाच्या संगतीत आहेत, कुठे जातात ह्याकडे पालकांचे
डोळ्यात तेल घालून लक्ष हवे. मुलांचे फाजिल लाड,
त्यांच्या अवास्तव मागण्या या कडे कानाडोळा करून
योग्य वेळी त्यांना बक्षिसही द्यायला हवे. जास्त पैसा मुलांना
बिघडवतोच, शिवाय त्यांना मग पैशाची किंमती रहात नाही.
काही मुलांना तर नाही शब्दच ऐकण्याची सवय नसते
इतका पॅाकेटमनी पालक मुलांना देतात. आमच्यावेळी कुठे
होता पॅाकेटमनी? पालक वेळोवेळी सर्व गरजा पुरवत
होतेच. त्यातूनच आम्हाला काटकसरीची सवय लागली.
थोडक्यात , बालपणापासून तुम्ही घडवाल(काही अपवाद सोडून)तशी मुले घडतात.
नाही तर तुम्ही पैशांमागे धावतांना त्यांना वेळच
दिला नाही तर दोष कुणाचा..?
सुमती पवार UK