You are currently viewing शिवसेनेला निवडून दिल्याची चूक जनतेला कळलीय….

शिवसेनेला निवडून दिल्याची चूक जनतेला कळलीय….

मच्छीमारांना देण्यात आलेले पॅकेज फसवे

– राजन तेली

कणकवली
आर्थिक मंदी, कोरोना महामारी काळातही राज्यातील महाविकास आघाडी सरकारने जनतेच्या माथ्यावर वीजबिलांचे प्रचंड ओझे टाकले आहे. त्यामुळे शिवसेनेला निवडून दिल्याची चूक जनतेला कळली आहे असे प्रतिपादन भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज केले. तसेच आमचे आंदोलन शांततेत सुरू असताना पोलिस प्रशासन दादागिरी करत असेल तर ते आम्ही खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिला.
श्री.तेली यांनी येथील भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले, वीजबिल माफीबाबत आघाडी सरकार जनतेची धूळफेक करत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून वाढीव वीजबिलांविरोधात उद्रेक होत आहे. पण त्याची पर्वा ठाकरे सरकारला नाही. किंबहुना या सरकारमधील मंत्र्यांमध्ये कुठलाच ताळमेळ राहिलेला नाही. उर्जामंत्री अजूनही १०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांना वीजबिलमाफी देण्यास तयार असल्याचे सांगतात. तर दुसरीकडे भाजप सरकारच्या काळात थकबाकी वाढल्याने वीजबिलात माफी देता येत नसल्याचे स्पष्टीकरण शासनाकडून दिले जात आहे.
ते म्हणाले, राज्यात शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षांचे सरकार येऊन एक वर्षाचा कालावधी उलटला. त्यानंतर आता त्यांना वीज थकबाकी असल्याचे लक्षात आले. यावरून गेले वर्षभर हे सरकार निद्रिस्त होते असाच अर्थ निघतो. वाढीव वीजबिलाबाबत जनतेच्या भावना तीव्र आहेत. त्या आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून मांडल्या. मात्र पोलिसांनी आंदोलकांवर दादागिरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र यापुढे आम्ही पोलिसांची दादागिरी सहन करणार नाही. आंदोलकांना अडविण्यापेक्षा पोलिस यंत्रणेने जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याला प्राधान्य द्यावे.
तेली म्हणाले, सर्वच आघाड्यांवर ठाकरे सरकारने फसवणूक सुरू केली आहे. निसर्ग वादळातील नुकसानग्रस्तांना मदत करण्यासाठी १० कोटी ५५ लाखाची मागणी करण्यात आली होती. प्रत्यक्षात ३५ लाख एवढीच रक्कम देण्यात आलीय. गतवर्षीच्या भातपीक नुकसानीसाठी १० कोटी ५५ लाख रुपयांची मागणी होती. प्रत्यक्षात ५ कोटी ५० लाख एवढंच निधी मिळाला आहे. याखेरीज मच्छीमारांना देण्यात आलेले पॅकेज फसवे आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा