उद्या होणार ऑनलाइन भूमिपूजन
सावंतवाडी
कोकण रेल्वेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ व सावंतवाडी रेल्वे स्थानकांचे रूप पालटणार असून आता ही स्थानके नव्या व आकर्षक स्वरूपात प्रवाशांच्या स्वागतासाठी सज्ज होणार आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक परिसरातील जोड रस्त्यांचेही कॉंक्रिटीकरण करण्यात येणार आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळांप्रमाणे रेल्वे स्थानकांचा परिसर उजळून निघणार असून त्यामुळे रेल्वे प्रवाशांना तसेच देश विदेशातील पर्यटकांसाठी एक नवे आकर्षण निर्माण होणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून हे नवनिर्माण होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे स्थानकाना जोडणाऱ्या रस्त्याचे कॉक्रिटीकरण व सर्व रेल्वे स्थानक परिसरांचे सुशोभीकरण करण्याचे काम महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले असून या कामाचे ऑनलाईन भूमिपूजन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार यांच्या हस्ते मंगळवार ८ ऑगस्ट रोजी ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.
या कार्यक्रमाला केंद्रीय सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग मंत्री ना. नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, आमदार निरंजन डावखरे, आमदार अनिकेत तटकरे, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक तसेच जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
तरी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन सार्वजनिक बांधकाम कोकण प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज, अधीक्षक अभियंता छाया नाईक, कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड व वैभववाडी उपविभाग अधीक्षक विनायक जोशी यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हयाची स्थापना सन १९८२ मध्ये झाली असून जिल्ह्यामधून कोकण रेल्वे वाहतूक सर्वसाधारणपणे सन १९९८ पासून सुरु आहे. कोकण रेल्वे मार्गावर बांधण्यात आलेल्या रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या रस्त्यांचे काम रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आलेले असून सदरील रस्त्यांची देखभाल व दुरुस्तीची कामे अनेक वर्ष न झाल्याने रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे. रेल्वे मार्गावरुन जाणाऱ्या सर्व प्रवाशांना याच मार्गावरुन ये-जा करावी लागते. राज्यातील रेल्वे स्थानकांना जोडणारा रस्ता सुशोभित व चांगल्या दर्जाचा असावा तसेच रेल्वे स्थानक परीसर अधिक दर्जेदार करण्यात यावेत अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. रविंद्र चव्हाण यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत. त्यामध्ये सिधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ व सावंतवाडी या स्थानकांचा प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे. त्याप्रमाणे सदरील चार रेल्वे स्थानकाना जोडणाऱ्या रस्त्याचे कॉक्रिटीकरण व सुशोभीकरण करण्याच्या कामांचा मार्च अर्थसंकल्प २०२३ मध्ये समावेश करण्यात आला असून त्यांच्या भूमिपूजनाचा सोहळा मंगळवारी संपन्न होणार आहे.