माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत
ओरोस :
सिंधुदुर्ग मध्ये काजू उत्पादन वाढत असून काजू प्रक्रिया उद्योग सुद्धा उभारी घेत आहेत. रोजगार निर्मितीच्या दृष्टीने काजू प्रक्रिया उद्योगांचे सक्षमीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालय, ओरोस येथे काजू प्रक्रिया उद्योजकांच्या उपस्थित बैठक झाली. बैठकीला बेंगलोर येथील मार्केटिंग आणि ब्रँडिंग तज्ञ सुरेश किशीनानी आणि सत्या हे खास उपस्थित होते. सभेमध्ये ब्रिगे. सुधीर सावंत यांनी मार्गदर्शन केले. काजू बोंडाचे विविध प्रक्रिया पदार्थावर भर देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी अलिकडेच केंद्रीय अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था म्हैसूर येथे भेट दिली असून लवकरच त्या संस्थेबरोबर कृषि विज्ञान केंद्राचा सामंजस्य करार करणार असून बोंडाच्या प्रक्रिया विषयी तंत्रज्ञान सिंधुदुर्ग मध्ये प्रसारीत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. म्हैसूर येथे सिंधुदुर्ग मधील युवकांना लवकरच प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे. काजूचे बाय प्रॉडक्ट मोठ्या प्रमाणात निर्माण करून त्याला योग्य बाजारभाव मिळण्यासाठी दिशा ठरविण्याची गरज आहे असे ते म्हणाले. जिल्ह्यातील पिकणाऱ्या काजू पासून तीन ते चार महीने प्रक्रिया उद्योग चालतात. परंतु हे उद्योग वर्षभर चालणे गरजेचे आहे. त्यातून स्थानिक महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होते. काजू प्रक्रिया उद्योजकांना मोठ्या प्रमाणात काजू बी आयात करावी लागते. म्हणून हे उद्योग सक्षमीकरण करण्यासाठी काजू बी पुरवठ्याचे नियोजन करून स्थानिक उद्योजकांना योग्य दरामध्ये काजू बी उपलब्ध करून देण्याचे ठरविण्यात आले. काजू बी पुरवठा आणि प्रक्रिया युक्त काजू गराच्या मार्केटिंगचे नियोजन काजू सहकारी संस्थेद्वारे करण्यात येईल. तसेच काजू बोर्ड स्थापन करण्यात येईल, असे माजी खासदार ब्रिगे. सुधीर सावंत म्हणाले.
या सभेला विरण ता. मालवण येथील प्रसिद्ध काजू प्रक्रिया उद्योजक सुरेश नेरूरकर उपस्थित होते. शेतकऱ्यांनी काजू बी विकण्यापूर्वी ती योग्य पद्धतीने वाळविणे गरजेचे आहे. तसेच वेंगुर्ला ४ व वेंगुर्ला ७ या जातींचे वर्गीकरण करून बी विकल्यास शेतकऱ्यांना अधिक भाव मिळू शकतो असे सुरेश नेरूरकर म्हणाले. पोखरण, ता. कुडाळ येथील काजू प्रक्रिया उद्योजक एस्. के. सावंत यांनी प्रक्रियादारांना खेळते भांडवल कमी पडत असून त्यासाठी बँकेची योजना असणे आवश्यक आहे असे म्हणाले. सभेला सिंधुदुर्ग जिल्हा कृषि प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रदिप सावंत, सचिव शांताराम रावराणे, कृषि विभाग उप संचालक अरुणा लांडे, कृषि विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख भास्कर काजरेकर, छत्रपती शिवाजी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य योगेश पेडणेकर, यशवंत पंडीत, ज्ञानेश्वर केळजी, वैभव होडवडेकर, प्रताप चव्हाण, शास्त्रज्ञ, अधिकारी व काजू बागायतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.