मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) :
भारताने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा २०० धावांनी पराभव करत तीन सामन्यांची मालिका २-१ अशी जिंकली. भारताने वेस्ट इंडिजविरुद्धची सलग १३वी एकदिवसीय मालिका जिंकली आहे. भारताने एकाच संघाविरुद्ध सलग सर्वाधिक एकदिवसीय मालिका जिंकण्याचा स्वतःचा विक्रम मोडीत काढला आहे. याबाबत पाकिस्तान दुसऱ्या क्रमांकावर आहे, त्यांनी झिम्बाब्वेविरुद्ध सलग ११ एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने पाच गड्यांच्या मोबदल्यात ३५१ धावा केल्या. भारताकडून चार फलंदाजांनी अर्धशतकी खेळी खेळली. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ ३५.३ षटकात १५१ धावांवर गारद झाला आणि २०० धावांनी पराभूत झाला. भारताचा वेस्ट इंडिजविरुद्ध एकदिवसीय मालिकेमधला हा दुसरा मोठा विजय आहे. यापूर्वी २०१८ मध्ये भारताने वेस्ट इंडिजचा २२४ धावांनी पराभव केला होता.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिल आणि ईशान किशन यांनी भारतीय संघाला पुन्हा एकदा चांगली सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी १४३ धावांची भागीदारी केली. वेस्ट इंडिजमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारताकडून ही सर्वोच्च सलामी ठरली आहे. या दोघांनी २०१७ मध्ये धवन आणि रहाणेचा विक्रम मोडला. किशनने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत सलग तिसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले. फिरकीपटू कारियाविरुद्ध मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो ७७ धावांवर यष्टिचित झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या ऋतुराजने आठ धावा केल्या, मात्र चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या संजू सॅमसनने धडाकेबाज फलंदाजी केली. ४१ चेंडूत ४ षटकार आणि २ चौकारांच्या मदतीने ५१ धावा करून बाद झाला.
शुभमन गिल अर्धशतक झळकावल्यानंतर खेळपट्टीवर राहिला आणि मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत होता, मात्र ८५ धावांवर एका असामान्य उसळीच्या चेंडूवर तो गुडाकेश मोतीकरवी झेलबाद झाला. गिल गेल्या काही डावांत खराब फॉर्मशी झुंजत होता, पण या अर्धशतकाने तो लयीत परतला. वेस्ट इंडिज दौऱ्यावर त्याने सहा डावांत पहिले अर्धशतक झळकावले. त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील सहावे अर्धशतक झळकावले.
यानंतर कर्णधार हार्दिकसह सूर्यकुमारने भारताचा डाव पुढे नेला. सूर्या सहाव्या क्रमांकावर चांगला खेळत होता आणि मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात ३५ धावांवर बाद झाला. दोघांनी ६५ धावा जोडल्या. अखेरीस, हार्दिकने तुफानी धावा केल्या आणि ५२ चेंडूत ७० धावा करून नाबाद राहिला. त्याने चार चौकार आणि पाच षटकार मारले. त्याने त्याच्या एकदिवसीय कारकिर्दीतील १० वे अर्धशतक झळकावले. अखेरीस भारतीय संघाने पाच गडी गमावून ३५१ धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून रोमॅरियो शेफर्डने दोन बळी घेतले. अल्झारी जोसेप, गुडाकेश मोती आणि यानिक कारिया यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली. मात्र, मोतीशिवाय वेस्ट इंडिजचे सर्व गोलंदाज धावा रोखण्यात अपयशी ठरले.
भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध पाच विकेट्सवर ३५१ धावांची मोठी धावसंख्या उभारली. वेस्ट इंडिजमध्ये विंडीजविरुद्ध भारताची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी २००९ मध्ये भारताने किंग्स्टनमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ६ बाद ३३९ धावा केल्या होत्या. भारताने प्रथमच एकदिवसीय सामन्यात एकाही फलंदाजाने शतक न करता ३५० हून अधिक धावा केल्या. याआधी भारताने २००५ मध्ये नागपुरात श्रीलंकेविरुद्ध ६ बाद ३५० धावा केल्या होत्या.
वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ व्यवस्थापनाचा प्रयोग आगामी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी सुरू आहे कारण, नियमित कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहलीला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून विश्रांती देण्यात आली होती. याआधी दुसऱ्या सामन्यात दोन्ही फलंदाजांना विश्रांती देण्यात आल्याने संघाचा पराभव झाला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि फिरकीपटू अक्षर पटेल यांच्या जागी ऋतुराज गायकवाड आणि डावखुरा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले.
ईशानने ६४ चेंडूत ७७ धावा केल्या आणि यादरम्यान त्याने आठ चौकार आणि तीन षटकार ठोकले. त्याने मोतीच्या बॉलवर एकेरी घेत ४३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तो आपल्या शतकाच्या दिशेने वाटचाल करत असताना कारियाच्या चेंडूवर षटकार मारण्याच्या प्रयत्नात यष्टिचित झाला. त्याने आणि गिलने पहिल्या विकेटसाठी १४३ धावांची भागीदारी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली. या एकदिवसीय मालिकेतील कोणत्याही विकेटसाठीची ही सर्वोच्च भागीदारी आहे. ईशानने आपली उत्कृष्ट लय सुरू ठेवत सलग तिसरे अर्धशतक झळकावले. सध्याच्या वेस्ट इंडिज दौऱ्यातील त्याचे हे चौथे अर्धशतक आहे. याआधी त्याने दुसऱ्या कसोटीत अर्धशतक झळकावले होते. त्याने एकदिवसीय कारकिर्दीतील सहावे अर्धशतक झळकावले.
सध्याच्या एकदिवसीय मालिकेत पहिल्यांदाच खेळणाऱ्या ऋतुराजला संधीचा फायदा उठवता आला नाही. त्याने सुरुवातीपासूनच संघर्ष केला आणि अल्झारी जोसेफच्या चेंडूवर किंगने त्याचा झेल घेतला. त्याला १४ चेंडूत केवळ आठ धावा करता आल्या. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात नऊ धावा करणाऱ्या संजू सॅमसनने तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात दमदार सुरुवात केली. त्याने कारियाच्या षटकातील तिसऱ्या आणि सहाव्या चेंडूवर दोन शानदार षटकार ठोकले. या संधीचा फायदा घेत त्याने कारकिर्दीतील तिसरे अर्धशतक पूर्ण केले. मात्र, तो (५१) शेफर्डच्या चेंडूवर हेटमायरने झेलबाद झाला. त्याने हार्दिकसोबत पाचव्या विकेटसाठी ६५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
कसोटी मालिकेत वेस्ट इंडिजचे फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. पहिल्या एकदिवसीय सामन्यातही संघ ११४ धावांवरच मर्यादित राहिला. शाई होप आणि केसी कार्टीने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात संघाला विजय मिळवून दिला असला तरी या सामन्यात कॅरेबियन फलंदाज पुन्हा पूर्णपणे अपयशी ठरले. ३५२ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजने १७ धावांत तीन विकेट गमावल्या. मुकेश कुमारने तिन्ही विकेट घेतल्या. यासह विंडीजचा पराभव निश्चित झाला. ५० चेंडूत ३२ धावा करताना अॅलिक अथंजेने थोडा संघर्ष केला, परंतु त्याला कोणाचीही साथ मिळाली नाही.
वेस्ट इंडिजच्या पहिल्या सात फलंदाजांमध्ये केवळ अथंजे दहाचा आकडा पार करू शकला. मात्र, यानिका कारियाच्या १९, अल्झारी जोसेफच्या २६ आणि गुडाकेश मोतीच्या ३९ धावांच्या खेळीने पराभवाचे अंतर कमी केले आणि भारताची प्रतीक्षा वाढवली. वेस्ट इंडिजने ८८ धावांत आठ विकेट गमावल्या पण अल्झारी जोसेफ आणि गुडाकेश मोती यांनी अर्धशतकी भागीदारी करून भारतीय गोलंदाजांना अडचणीत आणले.
भारताकडून मुकेश कुमारने पॉवरप्लेमध्ये शानदार गोलंदाजी करत तीन बळी घेतले. त्याचवेळी शार्दुल ठाकूरने मधल्या षटकांमध्ये दोन विकेट घेत वेस्ट इंडिजचा डाव संपुष्टात आणला. या सामन्यात त्याने चार विकेट घेतल्या. कुलदीप यादवने दोन तर जयदेव उनाडकटला एक विकेट मिळाली.
ईशान किशनला मालिकावीर तर शुभमन गिलला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.