शशांक बावचकर, प्रकाश मोरबाळे यांची माहिती
इचलकरंजी : प्रतिनिधी
इचलकरंजी महानगरपालिकेच्या मालकीच्या असणाऱ्या शहरातील विविध ठिकाणच्या २० शाळांमध्ये दुरुस्तीची कामे न करता जवळपास ९८ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती माजी नगरसेवक शशांक बावचकर व प्रकाश मोरबळे यांनी पत्रकार बैठकीत दिली. तसेच सदर सदर कामाची पाहणी करून सखोल चौकशी करावी मक्तेदारासह त्यात कोण कोण दोषी आहेत.त्यांच्यावर कडक कारवाई करावी असे निवेदन महानगरपालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
इचलकरंजी शहरातील विविध ठिकाणच्या शाळातील काम दुरुस्तीच्या नावाखाली काही मक्तेदारांनी लाखो रुपयांचे घोटाळे केले. काही ठिकाणी मंजूर असणारी कामे न करताच मनमानी पद्धतीने दुसरीच कामे केली. ते निकृष्ट दर्जाचे झाले. सध्या अनेक ठिकाणी दुरुस्त केलेल्या शाळा गळत आहेत. ही सर्व कामे प्रशासकीय कालावधीत म्हणजेच जून, जुलै 2022 पूर्ण करण्यात आले. हे घोटाळे हळूहळू आपण बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. तसे पुन्हा नव्याने घोटाळे उघडकीस येत आहेत. ही गंभीर बाब असून जोपर्यंत दोषीवर कडक कारवाई होत नाही , तोपर्यंत आपण याचा पाठपुरावा करू असे स्पष्ट करीत बावचकर व मोरबळे म्हणाले की पद्मावती कन्या विद्यामंदिर शाळा क्रमांक 17 मध्ये इमारतीची गळती काढणे दरवाजे व खिडक्या बसवणे हे काम मे. पाटणी कन्स्ट्रक्शन यांना आठ लाख 64 हजार रुपयांना देण्यात आले होते. तथापि मक्तेदाराने दरवाजे खिडक्या व दुरुस्तीचे काम न करता रंगकाम व फरशी बसवल्याच्या आढळून आले. तसेच सरदार वल्लभाई पटेल शाळा क्रमांक 15 मे पाटणी कन्स्ट्रक्शन यांना आठ लाख 51 हजार रुपयांचे गळती व कोबा दुरुस्तीचे काम दिले होते, तेही पूर्ण झाले नाही. सरहद्द गांधी खान अब्दुल गफारखान शाळा मक्तेदार सुनील भोने चार लाख 75 हजार, बाबुराव आवाडे विद्यामंदिर क्रमांक 51 मक्तेदार अनिल गाडीवडर एक लाख 70 हजार, पु.बा. सुभेदार शाळा क्रमांक 48 मक्तेदार सुनील भोणे तीन लाख तेहतीस हजार, डॉक्टर राधाकृष्ण विद्यामंदिर मक्तेदार अलका सूर्यवंशी एक लाख 42 हजार, तांबे माळ येथील शाळा क्रमांक 23, 24, 45, 49 मक्तेदार प्रिया नाईक आठ लाख 78 हजार, रफी अहमद किडवाई शाळा क्रमांक 45 मक्तेदार पाटणे सात लाख 31 हजार, मौलाना आझाद शाळा क्रमांक 20 मक्तेदार सुनील भोने एक लाख 41 हजार, शाळा क्रमांक 53 एक लाख 47 हजार, बाबू गेनू विद्यामंदिर मक्तेदार बाळाप्पा हुलेमनी आठ लाख 80 हजार, अहिल्यादेवी होळकर शाळा, मक्तेदार पाटणी कन्स्ट्रक्शन सात लाख 26 हजार, रवींद्रनाथ टागोर विद्यामंदिर मक्तेदार बाळाप्पा हुलेमनी पाच लाख चार हजार अशी कामे निविदा काढून देण्यात आली होती. जवळपास 98 लाख रुपयांच्या कामात बोगस व अनियमितपणा दिसून येत असल्याचेही शशांक बावचकर व प्रकाश मोरबाळे यांनी सांगितले.