पालकमंत्र्यांनी घेतला पूरपरिस्थितीचा आढावा
समन्वयाने संभाव्य पूरस्थिती हाताळा – पालकमंत्री रविंद्र चव्हाण
सिंधुदुर्गनगरी
जिल्ह्यात सातत्याने पाऊस सुरू आहे. सध्याची परिस्थिती प्रशासनाने उत्तमरित्या सांभाळली आहे. पावसाचा वाढता जोर लक्षात घेता संभाव्य परिस्थिती हाताळण्यासाठी सर्व यंत्रणांनी अलर्ट मोडवर राहून समन्वयाने परिस्थिती हाताळण्याचे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिले.
जिल्ह्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती व उपाययोजना संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल आदी उपस्थित होते.
श्री. चव्हाण म्हणाले, पावसाचा जोर वाढत आहे त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे. तरी नागरिकांनी नदीच्या तसेच लहान लहान ओढ्याच्या पात्रात जाऊ नये. प्रशासनाने दिलेल्या सुचनांचे पालन करावे. पुलावरून पाणी जात असल्यास तेथील वाहतूक वळवावी आणि तशा सूचना नागरिकांना द्याव्यात. पावसानंतर निर्माण होणाऱ्या साथींच्या रोगांचा विचार करता आवश्यक औषधांचा पुरवठा करुन साथींच्या रोगांवर नियंत्रण मिळवा तसेच पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची देखील तपासणी करावी. तिलारी धरणाच्या परिसरातील गावांमध्ये यंत्रणा अलर्ट मोडवर ठेवा तसेच नागरिकांना नेहमी सूचना देत रहा. आंबोली परिसरात अनेक ठिकाणांहून पर्यटक येत असतात त्यांना खबरदारी विषयी जागृत करा. डोंगरी भागात राहणाऱ्या नागरिकांनी दक्ष राहावे. काही अडचण आल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क करावा व प्रशासनाने देखील कायम अलर्ट मोडवर राहुन पूरस्थितीचा मुकाबला करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
सध्याची परिस्थिती हाताळण्यामध्ये सर्व यंत्रणांची भूमिका महत्वाची आहे. सर्वांनी मुख्यालयातच राहावे. आपत्ती लक्षात घेता कोणीही आपल्या कामात निष्काळजीपणा करु नये अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पालकमंत्री म्हणाले.
बैठकीच्या सुरूवातीला जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी पूरस्थिती आणि करण्यात आलेल्या उपाययोजनांविषयी सविस्तर माहिती दिली. तिलारी धरणातून पाणी पातळीचा अंदाज घेऊन विसर्ग सुरू आहे. परिसरातील 8 गावांना अधिक धोका असल्याने त्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज आहे. धरणातून विसर्ग सुरू होण्यापूर्वी संवेदनशील गावांमध्ये ग्रामस्थ व शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतो. दरडप्रवण क्षेत्रात विशेष दक्षता घेण्यात येत आहे. तसे सूचना फलक देखील लावण्यात आले आहेत. नुकसान भरपाई बाबत अनुदानाचे वाटप करण्यात आले असून परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याचेही त्या म्हणाल्या.