मनसेची महावितरणच्या अधिक्षक अभियंत्यांकडे मागणी
कुडाळ
महाराष्ट्र वीज वितरण कंपनी पणदूर शाखा कार्यालयाचे कामकाज मागील जवळपास दोन महिन्यांपासून प्रभारी सहाय्यक अभियंत्यांकडून काम चलाऊ पद्धतीने चालविले जात आहे. मुख्यालय अधिकारी नियुक्त नसल्याने वायरमन लाईनमन आदी कर्मचाऱ्यांमध्ये योग्य समन्वय साधला जात नसल्यामुळे मागील पंधरवड्यात परिसरातील सर्व गावांना विजेच्या अनियमिततेमुळे नाहक मनस्ताप सहन करावा लागल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी अधिक्षक अभियंत्यांची भेट घेतली.
महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बेजबाबदारपणे मागील दोन महिने पद रिक्त ठेवणे हे वायरमनच्या बाबतीत कुडाळ सारख्या जीवघेण्या विद्युत अपघातास कारणीभूत ठरू शकते याकडेही पदाधिकाऱ्यांनी लक्ष वेधले. मनसेचे माजी कुडाळतालुकाध्यक्ष यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून वीज देयके वसुलीसाठी जेवढी कार्यतत्परता दाखवली जाते तेवढी ग्राहकांच्या सेवाविषयक आवश्यक बाबींसाठी का दाखवली जात नाही असा थेट सवाल उपस्थित केला. येत्या १५ दिवसांच्या आत पणदूर शाखा कार्यालयात मुख्यालयी राहणाऱ्या अधिकाऱ्याची नेमणूक न केल्यास ग्रामस्थांनी वारंवार चाललेल्या विजेच्या लपंडावामुळे असंतोषातून उग्र आंदोलन केल्यास जनतेला जबाबदार धरू नये असा निर्वाणीचा इशारा देखील निवेदनाद्वारे दिला आहे. अधीक्षक अभियंता पाटील यांनी विभागीय कार्यकारी अभियंत्यांना दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पुढील तीन महिने अतिरिक्त पदभार हाकणाऱ्या प्रभारी अधिकाऱ्यांना पणदूर मुख्यालयी राहण्याबाबत सूचना केली व ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा करण्याचे आदेश दिले. यावेळी राजेश टंगसाळी, दीपक गावडे, गुरू मर्गज, वैभव धुरी यांसह स्थानिक ग्रामस्थही उपस्थित होते.