You are currently viewing अजूनही वेळ गेलेली नाही….अन्यथा..

अजूनही वेळ गेलेली नाही….अन्यथा..

कोरोनाचे संकट आटोक्यात आल्याचे वरवर दिसणारे देखावे आणि आकडेवारी ही मनाला आनंद देणारी आहे. परंतु खरोखरच कोविड-१९ चे संकट दूर झाले आहे का? जगात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जोरदार आगमन करत थैमान मांडले आहे. त्यामुळे भविष्यात कोविड-१९ ही अतिशय गंभीर बाब म्हणून समोर येऊ शकते. त्यामुळे भारतातही कोरोनाचा धोका संपलेला नसून येत्या काळात सुरू होणारी थंडीची लाट ही कोरोनाला पोषक ठरण्याचीच चिन्हे जास्त दिसत आहेत.
मध्यंतरीच्या काळात भारतात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत होते, परंतु तेवढ्याच प्रमाणात रुग्ण कोणताही इलाज न घेता बरेही होत होते, काहीजण हॉस्पिटलमध्ये दाखल होऊन इलाज घेऊन घरी परतत होते. परंतु कोरोना सोबत गंभीर आजार असलेले किंवा ज्यांना कोरोनाने आपल्या विळख्यात ओढून घेतलं असे काही रुग्ण मात्र दगावले होते. कोरोना होऊनही रुग्ण बरे होण्याचे प्रमाण पाहता लक्षणे दिसत असूनही भारतात बरेच जण तपासणी करून घेत नसल्याने किंवा घरच्या घरी उपचार करत असल्याने कोरोनाग्रस्तांची आकडेवारी कमी झालेली दिसून येते. परंतु दुर्दैवाने मृत्युदर मात्र वाढलेला दिसतो.
भारतात सणांचे दिवस आले आणि ईद, गणेशचतुर्थी, दिवाळीच्या काळात कोरोना पूर्णपणे नाहीसा झाल्याप्रमाणे लोकांचा वावर बाजारपेठेत वाढला आहे, कोरोना आजारातून पुर्णपणे बरे होणाऱ्या कित्येकांचा तर असा ग्रह झाला की कोरोनामुळे काहीच होत नाही. त्यामुळे लोकांनी मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर ठेवणे, हात धुवणे इत्यादी गोष्टींकडे दुर्लक्ष केला आहे. त्यामुळे सर्वत्र लोकांची गर्दी होताना दिसत आहे.
जनतेच्या भावनिक आवाहनांना जपताना सरकारने मंदिर, मस्जिद, चर्च, गुरुद्वारे यांची गेट उघडली आहेत. परंतु मंदिर, मस्जिद इत्यादीमध्ये जाताना कुठल्याही प्रकारची सुरक्षितता पाळण्यात येत नाही. येत्या काळात कोविड-१९ च्या संकटाकडे गंभीरपणे न बघितल्यास, योग्य ती खबरदारी न घेतल्यास येणारा काळ हा भारतीयांसाठी महाभयंकर संकटाचा असेल व परिस्थिती देखील हाताबाहेर गेलेली असेल. आजपर्यंत सरकारने देशात लॉक डाऊन हा पर्याय वापरला होता, परंतु परिस्थिती न सुधारल्यास हाताबाहेर गेल्यास देशात मेडिकल इमर्जन्सी लागू करण्याची पाळी येऊ शकते. तेव्हा मात्र वेळ गेलेली असणार आणि आपल्या सर्वांना त्याची किंमत मोजावी लागणार आहे.
अजूनही वेळ गेलेली नाही नागरिकांनी सर्व नियम काटेकोरपणे पाळून सरकारला सहकार्य करणे आवश्यक आहे…

प्रतिक्रिया व्यक्त करा