तरेळे – गगनबावडा मार्गावरील खड्डे भरण्याचे काम सुरू
वैभववाडी
आमदार नितेश राणे यांच्या दणक्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने तरळे – गगनबावडा मार्गावर खड्डे भरण्याचे काम सुरू केले आहे. पावसाळी डांबरानेच खड्डे भरण्याचे काम पूर्ण केले जाईल असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. डागडुज्जीचे काम सुरू झाल्याने प्रवासी व वाहन चालकांत समाधान व्यक्त होत आहे.
तरेळे – गगनबावडा या राष्ट्रीय महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे. नाधवडे, कोकिसरे करूळ गावानजीक मार्गावरुन चालणे ही अवघड झाले आहे. तर करूळ घाट अक्षरशा खड्ड्यात गेला आहे.
या पार्श्वभूमीवर शनिवारी आमदार नितेश राणे यांनी या रस्त्याची व घाटाची पाहणी केली. महामार्गाचे अधिकारी अतुल शिवनिवार यांना त्यांनी धारेवर धरत खडे बोल सुनावले होते. आमदार नितेश राणे यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर अधिकाऱ्यांनी मार्गावरील खड्डे पावसाळी डांबराणे त्वरीत भरले जातील व गटर सफाईची कामे केली जातील असे कबूल केले होते.
सोमवार पासून नाधवडे येथील खड्डे भरण्याचे काम सुरू झाले आहे. तर कोकिसरे, करुळ व करूळ घाटातील ही खड्डे भरण्यात येणार आहेत.केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नाने या महामार्गासाठी जवळपास 250 कोटी मंजूर झाले आहेत. हे काम देखील काही महिन्यात सुरु होणार आहे. मात्र त्यापूर्वी खड्डे भरण्यात येत असल्याने गावातील ग्रामस्थ, वाहन चालक व प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.