ना हरकत दाखला नसल्याने नेत्र रूग्णालयाचे ऑपरेशन थिएटर रखडले – नॅबचे अध्यक्ष अनंत उचगावकर
अन्यथा २८ तारखेला जनआक्रोश आंदोलन करणार…
सावंतवाडी
येथील नॅबच्या नेत्र रुग्णालयासाठी आवश्यक असलेला ना हरकत दाखला अद्याप पर्यंत पालिकेने दिला नसल्यामुळे ऑपरेशन थिएटरचे काम रखडले आहे. त्यामुळे हा दाखला तात्काळ देण्यात यावा, अन्यथा २८ जुलैला अंधबांधव व कर्मचाऱ्यांना घेऊन पालिकेसमोर जन आक्रोश आंदोलन करू, असा इशारा नॅबचे अध्यक्ष अनंत उचगावकर यांनी सावंतवाडी पालिकेला दिला आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रक दिले आहे.
यात त्यांनी असे म्हटले आहे की, येथील नॅब नेत्र रुग्णालयाच्या पार्ट परमिशनसाठी आवश्यक असलेल्या नाहरकत दाखल्यासाठी रितसर मागणी केली होती. मात्र पालिकेच्या यंत्रणेद्वारे सिस्टममध्ये दोष असल्याचे सांगून ऑफलाईन परमिशन मागितली आहे, असे उत्तर देऊन आठ दिवस थांबण्याची विनंती केली. मात्र आठ दिवस उलटूनही ना हरकत दाखला मिळत नसल्याने रुग्णालयासाठी आवश्यक असणाऱ्या पुढच्या परमिशन मिळत नाही. पर्यायाने नेत्र रुग्णालयातील ऑपरेशन थिएटर सुरू करताना अडथळे येत आहे, यामुळे सर्वसामान्य रुग्णांचे हाल होत आहेत.
एकूणच परिस्थिती पाहता येत्या २७ तारीख पर्यंत म्हणजे दोन दिवसात पालिका प्रशासनाकडून ना हरकत दाखला देण्यात यावा, अन्यथा २८ तारीखला प्रशासनाच्या विरोधात अंधबांधव रुग्णालय कर्मचारी व सामाजिक बांधिलकी मानणारे स्थानिक नागरिक यांच्यासह जन आक्रोश आंदोलन छेडावे लागेल, असे म्हटले आहे.