शाळेला सुट्टी असल्याने अनर्थ टळला
मालवण :
मालवण तालुक्यातील चाफेखोल येथील प्राथमिक शाळा चाफेखोल नं १ ची इमारत चार दिवस होत असलेल्या अती मुसळधार पावसामुळे कोसळली. सुदैवाने शाळेला सुट्टी असल्याने अनर्थ टळला. या इमारतीच्या परीसरात मुलांचा नेहमी वावर असायचा. पहिली ते सातवी पर्यंत असलेल्या आणि सध्या सुरू असलेल्या वर्गखोल्यांच्या इमारतीला लागूनच सदर इमारत असून या इमारतीमुळे धोका निर्माण झाला होता. त्यामुळे सदर इमारत निर्लेखीत करून त्याठिकाणी नवीन इमारत बांधून मिळावी यासाठी शिक्षक आणि पालक गेली काही वर्षे पाठपुरावा करत होते. परंतु संबंधित विभागाकडून प्रतिसाद मिळाला नाही. या पावसात मात्र सदर इमारत कोसळून धोका अधिक वाढला आहे.
वारंवार मागणी करूनही दखल न घेतल्याने चाफेखोल शाळेची ही इमारत कोसळून अत्यंत धोकादायक स्थितीत राहिली असून विद्यार्थ्यांच्या जिवीतास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे प्रशासनाने पुढील आठ दिवसात दखल घेऊन पालक ग्रामस्थ यांची मागणी पूर्ण न केल्यास विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणार नाही. तसेच तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बळीराम शिंदे यांनी दिला आहे.