*दै.ठाणे वैभवचे पत्रकार, स्तंभलेखक कवी ॲड.रूपेश पवार लिखित विशेष लेख*
*गेला कैलासी ‘तो एक राजहंस’ रविंद्र महाजनी*
अभिनेते रविंद्र महाजनी यांचा मृत्यू 11 जुलै 2023 रोजी झाला. पोलिसांना या घटनेची माहिती शनिवारी 15 जुलैला मिळाली. मग त्यांनी अभिनेते रविंद्र महाजनी यांचा पार्थिव ताब्यात घेतला. त्यावेळी प्रसार माध्यमात ही दुर्दैवी बातमी प्रसारित करण्यात आली. जीवन जगणाऱ्या प्रत्येक माणसाला मृत्यू हा येणार आहे पण रविंद्र महाजनी यांना मृत्यू त्यांच्या एकाकीपणात यावा, हे दु:ख वेदना देणारे आहे. अशी स्वाभाविक भावना त्यांच्या चाहत्यांची आहे. 7 ऑक्टोबर 1949 रोजी त्यांचा जन्म झाला. म्हणजे 74 वर्षांचे आयुर्मान त्यांना लाभले. त्यांना योग्य वेळी वैद्यकीय उपचार मिळाले असते, तर त्यांचे आयुर्मान अजून वाढले असते पण नियतीला हे मंजूर नव्हते. त्यामुळे रुपेरी पडदा काळवंडला आणि काळपटाने रविंद्र महाजनी यांना स्वर्गलोकीच्या रंगभूमीवर बोलावले, असेच आपल्याला म्हणावे लागेल.
आ पल्या तरुणपणात रविंद्र महाजनी यांनी रुपेरी पडदा पूर्णपणे गाजवला. चित्रपटात येण्यापूर्वी रविंद्र महाजनी हे नाटकातील रुबाबदार, देखणे नायक होते. मधुसूदन कालेलकर यांनी नवख्या रवींद्रला ‘जाणता अजाणता’ या नाटकात प्रथम संधी दिली. या नाटकातील रविंद्र महाजनी यांचा कलाविष्कार बघून कालेलकर त्यांच्यावर बेहद खुश झाले. मग त्यांनी रविंद्रजींना समोर ठेवून ‘तो राजहंस एक’ हे नाटक लिहिले. हे नाटक अभिनेते महाजनी यांनी गाजवले. याच नाटकामुळे मराठी चित्रपटसृष्टीला बॉलीवूडच्या दर्जाचा दमदार चॉकलेट हिरो मिळाला. दिग्दर्शक, निर्माते व्ही. शांताराम यांनी रंगभूमीवरील या हरहुन्नरी राजहंसाला, त्यांच्या ‘झुंज’ या चित्रपटात घेतले. हा चित्रपट त्या काळात लोकप्रिय ठरला. ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ हे या चित्रपटातील गीत खूप गाजले. आजही ते गाणे मराठी सिने रसिकांच्या ओठावर आहे. त्यातही रविंद्र महाजनी यांचा अफलातून अभिनय आहे. यानंतर अनेक दिग्दर्शक, निर्मात्यांनी रविंद्र महाजनी यांना घेऊन अप्रतिम कलाकृती साकारल्या. त्या कलाकृतींमध्ये ‘आराम हराम आहे’, ‘लक्ष्मी’, ‘लक्ष्मीची पावले, ‘देवता’, ‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, ‘हळदीकुंकू’ असे काही सुपर डुपर हिट सिनेमे येतात. अपराध मीच केला हे त्यांचे नाटकही त्याच काळात रसिकांना आवडले होते.
अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या संवाद शैलीत एक प्रकारचा वेगळा गोडवा जाणवायचा. त्यामुळे त्यांच्या रोमँटीक भूमिका अधिक उठावदार होत होत्या. संवेदनशील भावूक व्यक्तिरेखा त्यांनी फार चांगल्या रीतीने गाजवल्या. त्यांच्या काही भूमिकांमध्ये मराठी ‘अँग्री यंग मॅन’ दिसायचा. ‘देवता’ या चित्रपटात त्यांनी अशाच प्रकारचा अभिनय केला होता. ‘मुंबईचा फौजदार ‘ या सिनेमात रवींद्रजींनी आधी स्वप्नात रंगलेला प्रियकर आणि नंतर स्वप्न भंगलेला अशिक्षित, गावरान बायकोचा नवरा, अशी दुहेरी व्यक्तिरेखा फार चांगली निभावली होती. शहरी जीवनातील वागण्या बोलण्याचा शिष्टाचार न समजणाऱ्या बायकोला समजावून सांगताना येणारा मनातील राग त्यांनी सुंदर पद्धतीने रसिकांसमोर ठेवला. अभिनेत्री रंजना यांनी देखील या चित्रपटात रवींद्रजींना चांगली साथ दिली होती. या सिनेमातील ‘हा सागरी किनारा’ आणि ‘सहजीवनात आली ही स्वप्नसुंदरी’ ही दोन सुमधुर गाणी अजूनही पाहिली जातात. अशाप्रकारे रवींद्र महाजनी यांची जादू आजही रसिक मनावर चालते. त्याचप्रमाणे ‘हळदी कुंकू’ या चित्रपटात रवींद्रजींनी श्रीमंत पण शोषित नायकाची भूमिका केली होती. समजदार प्रेयसी आणि बायको या दोघींमधला एक हताश युवक या कथानकात दाखवला होता.
अशोक सराफ, रंजना, निळू फुले आणि अनेक मातब्बर कलाकारांसोबत रवींद्र महाजनी यांनी रुपेरी पडदा रंगवला होता. रवींद्र महाजनी यांच्या सुरुवातीच्या काळात तमाशाप्रधान चित्रपटांची चलती होती परंतु रवींद्रजींनी मराठी चित्रपटाचा तो ट्रॅक बदलला. मग आधुनिक जगाचा शहरी, ग्रामीण युवक त्यांच्या अभिनयातून दिसला. त्याच दरम्यान दादा कोंडके यांनी सिल्वर जुबली कॉमेडी मुड एक हाती उचलून धरला होता, तरीही रवींद्र महाजनी यांचे चित्रपट हिट ठरत होते. रवींद्र महाजनी यांनी मराठी मनावर राज्य केले. 1975 मध्ये त्यांनी चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल टाकले. 1990 पर्यंत त्यांची यंग, हँडसम कारकीर्द रंगतदार होती. त्यात त्यांनी मुख्य नायक आणि सह कलाकाराच्या अनेक भूमिका केल्या. त्यानंतर त्यांनी आपली सेकंड इनिंग चरित्र नायकाच्या भूमिकेत घालवत अभिनयात रंगत आणली. या अभिनयात रविंद्रजींनी ‘कॅरी ऑन मराठा’, ‘देऊळ बंद’, ‘पानीपत’ अशा अनेक चित्रपटात आपले कलाकौशल्य दाखवले. मधल्या काळात ते टीव्ही मालिकेतही झळकले.
रवींद्र महाजनी यांच्या सिने, नाट्य कामगिरीचा
आवाका खूप मोठा होता. वैविध्यपूर्ण भूमिकांचा कलाकार म्हणून रवींद्रजींना ओळखले जाते. त्यांनी ‘सात हिंदुस्तानी’ या चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ती त्यांची अभिनयाची पहिली सुरुवात होती. त्यावेळी रवींद्र महाजनी रंगभूमीवर सक्रिय होत होते. त्यानंतर त्यांना व्ही शांताराम यांनी मराठी चित्रपटात संधी दिली. मग रवींद्रजींनी मराठी बरोबर हिंदी, गुजराती चित्रपटात प्रमुख व सहाय्यक कलाकाराच्या भूमिका साकारल्या. त्यांना लोक मराठीतील विनोद खन्ना म्हणायचे. म्हणूनच रवींद्रजी त्याकाळच्या तरुणींच्या मनातील स्वप्नरंजक प्रियकर होते. सार्वजनिक जीवनात त्यांचे वागणे, बोलणे, राहणे जंटलमनसारखे आकर्षक होते. अमोल पालेकर तसेच काशिनाथ घाणेकर यांच्या पठडीतले ते सुंदर, देखणे, हँडसम अभिनेते होते. रवींद्रजींनी रमेश देव यांची निर्मिती असलेल्या ‘सर्जा’ या ऐतिहासिक मराठी चित्रपटात ‘शिवाजी महाराजांची ‘ भूमिका केली होती तसेच आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पानिपत’ चित्रपटातही रवींद्रजींनी मराठा सरदार मल्हारराव यांची ऐतिहासिक भूमिका केली. म्हणजे इतिहास विषयक भूमिकेतही त्यांनी आपले अभिनय कर्तृत्व निभावले.
रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावात झाला. त्यांचे
वडील ह. रा. महाजनी हे पत्रकार होते. त्यांनी ‘लोकसत्ता’ दैनिकात संपादक पदही निभावले होते. रवींद्रजींच्या जीवनात त्यांच्या वडिलांची भूमिका महत्त्वपूर्ण होती. रवींद्र महाजनी इंटर सायन्स परीक्षेत अपयशी ठरल्यावर वडिलांनी त्यांना पदवी शिक्षण घेण्याचा सल्ला दिला. त्यावेळी रवींद्रजींनी खालसा महाविद्यालयात बी.ए च्या पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्या महाविद्यालयात
रॉबिन भट्ट, रमेश तलवार, अवतार गिल, शेखर कपूर यांच्यासारखे कलाकार मित्र होते. त्यांनी पुढे चित्रपट • सृष्टी गाजवली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर रवींद्र महाजनी यांनी चित्रपट, नाटकात संधी शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. त्याच धावपळीत असताना रवींद्र महाजनी यांच्या वडिलांना देवाज्ञा झाली. घर कुटुंबाची जबाबदारी रवींद्रजींवर आली. मिळेल ते काम करता करता रवींद्र महाजनी यांनी आपली आवड जोपासली. रात्रीच्या वेळी काही वर्ष टॅक्सी चालवून, सकाळी चित्रपट, नाटकासाठी त्यांनी जीवाचे रान केले, ते त्यांचे सर्व प्रयत्न फळाला आले. त्यातून त्यांना रंगभूमीवर काम मिळाले. नऊ वर्षाने चित्रपटाचे दालन त्यांच्याकरता उघडले.
असा हा मराठी सिने, नाट्य, टीव्ही मालिका जगताचा नटश्रेष्ठ महानायक होता. एक मूर्तिमंत सौंदर्य रवींद्रजींना लाभले होते. त्या बळावर कोणतेही निर्माते, दिग्दर्शक त्यांना घेऊन चित्रपट कलाकृती साकारण्याकरता तयार असायचे. आपल्या देखण्या, रुबाबदार हुकूमतीच्या जोरावर रवींद्र महाजनी यांनी रुपेरी कलाकृतींना सुपर डुपर हिट केले. त्याकाळात हिंदी चित्रपटांना लोकप्रियतेचे फार मोठे वजन असताना मराठीत रवींद्र महाजनी यांचे सिनेमे मराठमोळ्या रसिक प्रेक्षकांना आवडायचे. असा हा कलाकार मराठी सिने विश्वाचा राजहंस होता. या राजहंसाने चित्रपट निर्मिती क्षेत्रातही आपली पावले टाकली होती. असा हा कलावंत उतारवयीन आजारपणात मात्र एकाकी पडला. मग काळाने त्यांच्यावर घाला घातला. हे एकटेपण रवींद्र महाजनी यांच्या वाट्याला का आले असावे. हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. त्यांच्या मागे पत्नी माधवी, मुलगी रश्मी आणि सध्याचा लोकप्रिय अभिनेता गश्मीर महाजनी असे कुटुंब आहे. रवींद्र महाजनी यांचा असा शेवटचा श्वास पाहून म्हणावेसे वाटते, असा मृत्यू कोणालाही येऊ नये. भगवंताने सर्वांवर दया दाखवावी हीच प्रार्थना! याच प्रार्थनेतून रवींद्र महाजनी यांच्या आत्म्याला शांती लाभो.
अँड. रुपेश पवार
9930852165