पुणे:
दि. १६-७-२०२३ रविवार रोजी, शब्दप्रेमी-विश्व शब्दांचे समूह आयोजित प्रथम काव्य संमेलन, आणि वैशाली पडवळ उर्फ एंजल वैशू यांनी प्रथमच संकलन केलेल्या “रंग जीवनाचे” व “खेळ जीवनाचा” या दोन्ही प्रातिनिधिक काव्य संग्रहांचा प्रकाशन सोहळा पुण्यात, हॉटेल ग्रॅंड एक्झॉटिका येथे मोठ्या दिमाखात पार पडला.
रोहिणी पब्लिकेशन्सच्या माध्यमातून संकलिका वैशाली पडवळ उर्फ एंजल वैशू यांनी या काव्य संग्रहांची निर्मिती केली.
या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध गझलकार श्री.सदानंद काळे हे उपस्थित होते तर संमेलनाध्यक्षा म्हणून सौ.श्यामलाताई पंडित (दिक्षित) यांना आमंत्रित केले गेले होते.
या कार्यक्रमाचे नियोजनबद्ध व सुटसुटीत, उत्कृष्ट आयोजन तसचं उत्तम सूत्रसंचालन श्री. योगेश माकोणे सर यांनी केले.
सर्व प्रथम मान्यवरांच्या हस्ते, श्री गणेश व सरस्वती माता यांच्या फोटो प्रतिमांचे पूजन करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
माकोणे सरांनी व संकलिका वैशाली ताईंनी प्रमुख पाहुणे व संमेलनाध्यक्षा यांच्या साहित्य क्षेत्रातील, प्रथितयश कामगिरीचा परिचय करून दिला.
त्यानंतर श्यामलाताईंनी , नवोदितांना कविता रचनांविषयी तर श्री.सदानंद काळे यांनी, शास्त्रशुद्ध काव्यरचना , गझलरचना कशी करावी ?? याविषयी अनमोल मार्गदर्शन नवोदितांना केले.
संकलिका वैशाली ताईंनी व समूह प्रमुख सिद्धार्थ सुर्वे सरांनी सुंदर शब्दांत त्यांचे विचार मांडत उपस्थितांची मने जिंकली.
त्यानंतर उपस्थित कवी/कवयित्रींना सदर काव्य संग्रहांच्या
प्रतीसह मेडल , सन्मानपत्र व आकर्षक लेखणी देऊन , गौरविण्यात आले.
अत्यंत सुनियोजित व खेळीमेळीच्या वातावरणात हा प्रकाशन सोहळा व काव्यसंमेलन समारंभ यशस्वीरित्या पार पडला.
या कार्यक्रमात नागपूर, अमरावती, फलटण, पंढरपूर, अहमदनगर, श्रीरामपूर, अशा दूरवरच्या हौशी कवी/कवयित्रींची उपस्थिती लाभली, ही कौतुकास्पद गोष्ट आहे.
संकलिका वैशाली पडवळ उर्फ एंजल वैशू यांनी आपल्या ओघवत्या शब्दांनी सर्वांचे आभार व्यक्त करत या सुंदर सोहळ्याची सांगता केली.