सावंतवाडी
गेले काही दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सावंतवाडीला पाणीपुरवठा करणारे कुणकेरी- पाळणेकोंड धरण पूर्ण क्षमतेने भरून वाहत आहे. या धरणाला बसविण्यात आलेल्या गोडबोले गेटचे सहाही हायड्रॉलिक दरवाजे उघडले आहेत. धरण पूर्ण भरल्याने शहरातील पाण्याचा प्रश्नही आता सुटणार आहे. जिल्ह्यातील धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून, त्यामुळे ठिकठिकाणची धरणे तुडुंब भरली आहेत. विशेष म्हणजे पाळणेकोंड धरणही पूर्ण क्षमतेने भरले आहे अशी माहिती माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली आहे. या धरणातून सावंतवाडी शहरासह कुणकेरी, कोलगाव, तसेच माजगाव, चराठे आदी गावांना पाणीपुरवठा होतो. त्यामुळे सावंतवाडी शहरासह या गावांना ही आनंदाची बातमी मिळाली असल्याने स्थानिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.