*’साहित्याची मिरगवणी’ कोमसाप सावंतवाडीचा उपक्रम माजगावात संपन्न*
*सावंतवाडी*
तालुक्यातील माजगावमधील खोतवाडा येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा क्रमांक १ येथे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सावंतवाडी शाखेच्या वतीने साहित्याची मिरगवणी उपक्रम उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात बालसाहित्यिकांनी सहभागी होत आपल्या अंगी असलेल्या कलागुणांनी आणि साहित्यिक गुणांनी उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी आमदार राजन तेली उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून कोकण मराठी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष मंगेश मसके, ज्येष्ठ साहित्यिक आनंद वैद्य, माजगावच्या सरपंच डॉ. अर्चना सावंत, कोमसाप सावंतवाडी तालुकाध्यक्ष ॲड.संतोष सावंत, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव राजू तावडे, खजिनदार डॉ. दीपक तुपकर, सदस्य कवी दीपक पटेकर, प्रा. रुपेश पाटील, विनायक गांवस, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, किसान मोर्चा जिल्हा चिटणीस अजय सावंत, माजी सरपंच दिनेश सावंत, माजी उपसरपंच संजय कानसे, ग्रामपंचायत सदस्य मधु कुंभार, माधवी भोगण देवस्थान कमिटीचे अध्यक्ष आनंद सावंत, केंद्रप्रमुख नरेंद्र सावंत यांसह विविध मान्यवर उपस्थित होते.
*पंतप्रधानांचे स्वप्नपूर्तीसाठी अशा उपक्रमांची गरज – राजन तेली*
दरम्यान कार्यक्रमाला उपस्थित असलेले माजी आमदार राजन तेली म्हणाले देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील बलशाली भारत निर्मितीसाठी अशा प्रकारच्या उपक्रमांची ग्रामीण भागात निश्चित गरज आहे. कोकणाला साहित्य परंपरा आहे, अशा उपक्रमामुळे ही परंपरा वृद्धिंगत होते. म्हणूनच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या उपक्रमांचे कौतुक केले पाहिजे. मी नेहमीच अशा उपक्रमांना पाठिंबा देत आलो आहे. यापुढेही कोमसापला परिपूर्ण सहकार्य करेल, अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली.
*सावंतवाडी शाखा जिल्ह्यात अव्वल..! – मंगेश मसके*
कार्यक्रमाला उपस्थित असलेले कोकण मराठी साहित्य परिषदेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष मंगेश मस्के म्हणाले की, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या एकूण कार्यक्षेत्रात असलेल्या शाखांमध्ये सावंतवाडी शाखेने अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवून अव्वल दर्जा प्राप्त केला आहे. त्यांच्या या एकूण कामगिरीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे ,असेही गौरवोद्गार मंगेश मसके यांनी काढले.
*लिहिते व्हा, पेरते व्हा..!- आनंद वैद्य*
यावेळी उपस्थित असलेले सिंधुदुर्गातील ज्येष्ठ साहित्यिक तथा सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष आनंद वैद्य म्हणाले साहित्यिक निर्मिती ही अखंड तपश्चर्या आहे. बालकांनी आतापासूनच आपल्यावर लेखनाचे संस्कार जोपासले पाहिजे. हीच संस्काराची ज्योत नेहमी प्रज्वलित ठेवली तर दर्जेदार साहित्य निर्माण होईल, असा आशावाद यावेळी श्री. वैद्य यांनी व्यक्त केला.
*बालसाहित्यिकांनी उधळले साहित्यिक रंग*
‘साहित्याची मिरगवणी’ या कोमसापच्या स्तुत्य उपक्रमाला माजगावातील सहा शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभागी होत उदंड प्रतिसाद दिला. या सहा शाळांतील विद्यार्थ्यांनी कथा, कविता, विडंबन, काव्य रचना तसेच नाट्य व गीते सादर करून आपल्या कलागुणांचे प्रदर्शन केले. त्यांच्या मालवणी भाषेतील विशेष सादरीकरणाला उपस्थित असलेल्या पालक, शिक्षक व साहित्यिक वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
उपस्थितांचे स्वागत सरपंच डॉ. अर्चना सावंत यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करत ॲड. संतोष सावंत यांनी सांगितले की, कोमसाप सावंतवाडी शाखा गेल्या वर्षापासून ‘साहित्याची मिरगवणी’ हा विशेष उपक्रम पावसाळ्यात घेत आहे. पहिल्या वर्षी निरवडे येथे हा उपक्रम सादर झाला, ज्याला साहित्यिक व साहित्यप्रेमींनी उदंड प्रतिसाद दिला. असेच उपक्रम आपण सातत्याने करत राहू व साहित्याची मेजवानी सर्वसामान्य विद्यार्थी व लोकांसाठी उपलब्ध करून देत राहू, असेही मत त्यांनी व्यक्त केले.
सूत्रसंचालन प्रा. रुपेश पाटील व विनायक गांवस यांनी केले. शेवटी उपस्थितांचे आभार अजय सावंत यांनी मांनले.